![]()
कोंढवा परिसरात एका ३२ वर्षीय विवाहितेला पतीने बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पती समीर बशीर मुजावर (वय ३३), सासू रैहाना बशीर मुजावर (वय ५६), सासरा बशीर मुजावर (वय ६२), जाऊ रिनाज बशीर मुजावर (वय ३०), सोनू (वय ३५, सर्व रा. मंगेश्वर गल्ली, उजगाव, कोल्हापूर), यासीन दिलावर नाईकवाडी (वय ३१) आणि रमजान महामुद सय्यद (वय ६२, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२२ पासून आजतागायत सासरच्या मंडळींनी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी पती समीर मुजावर याने ८ जानेवारी २०२६ रोजी विवाहितेला बेकायदेशीरपणे तिहेरी तलाक दिला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी एस. जाधव करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, लोहगाव परिसरात रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्याला अज्ञात व्यक्तीने लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे. अज्ञात व्यक्तीच्या हाकेकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञातावर लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन नवनाथ जाधव (वय २१, शिक्षण, रा. मोझे नगर, लोहगाव, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २२ जून रोजी रात्री आठ वाजता फिर्यादी आपल्या घरून डी.वाय. पाटील चौक ते पोरवाल रोड परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तिथे उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना आपल्याकडे बोलावले. मात्र, फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तो चिडला आणि “तू इकडे ये, मी तुला दाखवतो” असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर तिथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीला बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणाचा तपास लोहगाव पोलीस करत आहेत.
Source link
पतीकडून पत्नीला बेकायदेशीर 'तिहेरी तलाक':कोंढवा येथे पतीसह सात सासरच्यांवर गुन्हा दाखल