Headlines

मोहन भागवत मोदींचे गुलाम झालेत!:प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले- काँग्रेस आणि मविआचे नेते भाजपासोबत जाण्यास उत्सुक




वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२५ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुलाम झाले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत,” असा अत्यंत खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, राजकीय व्यवस्थेला लकवा मारला असल्याने आता सामान्य जनतेनेच याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. मविआचे नेते भाजपासोबत जाण्यास उत्सुक महाविकास आघाडीवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की, भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हे केवळ आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरे कोणीही करू शकत नाही. ‘बी टीम’चा शिक्का मारणारेच भाजपसोबत “ज्यांना आमची मदत पाहिजे होती, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि डाव्या पक्षांना आमचा फोर्स सोबत घ्यायचा नव्हता. म्हणूनच त्यांनी आम्हाला ‘बी टीम’ म्हणून स्टॅम्प मारण्याचे काम केले. मात्र, आज तेच लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.” काँग्रेस उमेदवार पळून गेले “महाविकास आघाडीतील आणि काँग्रेसमधील अनेक नेते भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत, यात कोणतेही आश्चर्य नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार पळून गेले, काही तर लढलेच नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. मोहन भागवत हे पंतप्रधान मोदींचे गुलाम देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकरांनी थेट संघावर प्रहार केला. “इथले राजकीय पक्ष गुलाम होतायत का? अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. अगदी आरएसएसचे मोहन भागवत हेदेखील पंतप्रधान मोदींचे गुलाम झालेले दिसत आहेत.” “आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींची ‘छी थू’ होत असून, देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची परिस्थिती आता सुरू झाली आहे.” जनतेनेच ठरवावा ‘खरा विरोधी पक्ष’ “राजकीय व्यवस्थेला जर लकवा लागला असेल, तर सामान्य लोकांनी त्याविरोधात आवाज उचलला पाहिजे. जनतेला विरोधी पक्ष पाहिजे की नको? हे आता ठरवण्याची वेळ आली आहे.” “जे पक्ष भाजपासोबत जाणार नाहीत, तेच खरे विरोधी पक्ष आहेत, हा निकष आता जनतेनेच लावला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. सीसीआय (CCI) घोटाळा आणि शेतकऱ्यांचा लढा पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (CCI) मुद्दा प्राधान्याने मांडला. “सीसीआयने विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या होत्या. मात्र, आता सीसीआयमध्ये नवीन पद्धत सुरू झाली आहे. २० ते २५ टक्के कापसाचे बेल (गाठी) पडेल भावाने विकून सीसीआयला जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीसीआय अडचणीत आली, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे थांबलेले शोषण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.” या चुकीच्या पद्धतीविरोधात अकोल्यातील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने हे प्रकरण ऐकून सीसीआय आणि शासनाला नोटीस पाठवली असून, दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर यावर अंतिम सुनावणी होणार आहे. या न्यायालयीन लढ्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ‘ॲग्रीकल्चर प्राईज कमिशन’चा (कृषी मूल्य आयोग) भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *