![]()
बाळापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता अत्यंत दुःखद वळण लागले आहे. अत्याचाराच्या मानसिक धक्क्यातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापूरमध्ये हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे. संतापजनक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलिस कर्मचारी पवन वडगावे हा गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला तरी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. आरोपी पोलिस कर्मचारी पवन वडगावेने पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी त्याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पीडित मुलगी तीव्र मानसिक आघाताखाली होती. याच नैराश्यातून तिने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती; परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. उपविभागीय कार्यालयावर संतप्त जमावाची धडक पीडितेच्या मृत्यूची बातमी पसरताच तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थांचा संताप उफाळून आला. संतापलेल्या नागरिकांनी आणि नातेवाइकांनी तातडीने पोलिस उपविभागीय कार्यालयावर धडक देत जोरदार ठिय्या आंदोलन केले. गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिस कर्मचारी महिनाभर फरार कसा राहू शकतो? असा संतप्त सवाल करत, आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदनाची मागणी या प्रकरणाच्या तपासात कोणतीही कुचराई होऊ नये आणि पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी पीडितेचे शवविच्छेदन तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाकडूनच करण्यात यावे, अशी ठाम भूमिका नातेवाइकांनी घेतली. प्रशासनाकडून या मागणीला होकार देत आश्वासन मिळाल्यानंतरच, पुढील उत्तरीय तपासणीसाठी पीडितेचा मृतदेह अकोला येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांकडून शांततेचे आवाहन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी थेट पीडितेच्या घरी धाव घेतली. संतप्त नातेवाईक आणि नागरिकांची समजूत घालत पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मात्र, आरोपी अद्याप पकडला न गेल्याने असल्याने नागरिकांमधील असंतोष कायम असून, त्याला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान आता अकोला पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
Source link
बाळापूर लैंगिक अत्याचार प्रकरण:उपचारादरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू, आरोपी महिनाभरापासून फरार