Headlines

भक्तीच्या महासागरात न्हाली अवघी पंढरी…:भजन-कीर्तन करत विठूभक्त पंढरपुरात येतात… त्यामुळे आषाढीचा सोहळा कीर्तनाच्या स्वरूपात सांगणारा हा दिव्य मराठीचा प्रयोग




जय जय राम कृष्ण हरी।
काय सांगू तुम्हाला माउली, या पंढरपूरनगरीत अतिशय प्रसन्न वातावरण आहे बरं. सूर्यदेवाची कोवळी किरणं आसमंताला प्रकाशून टाकताहेत अन् भक्तीच्या महासागरात अवघी पंढरी न्हालीय. पहाटेच्या उत्तरप्रहरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची मुख्य शासकीय महापूजाही झालीय. आषाढी एकादशीच्या महापर्वाला चहूकडे अवघा रंग एक झालाय. आणि पाहा, विठ्ठलनामाचा गजर नभाला भिडत चाललाय. पंढरपुरात आनंद ओसंडून वाहतोय. अगदी संत तुकाराम महाराजांनी ज्या सुंदर शब्दात वर्णन केलं तसंच वातावरण आहे. आनंदाचे डोहीं आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदचि अंग ॥ १ ॥ आणि माउली… पाहावं तिकडे भजन-कीर्तन, टाळ-मृदंगाचा गजरही कानी पडतोय. हातात भगव्या पताका आणि मुखात एकच नाव—‘माउली… माउली! जय हरी विठ्ठल’. आणि तिकडं विठ्ठल मंदिरासमोर पांडुरंगाच्या दर्शनासाठी अतिशय शिस्तबद्ध रांग लागली आहे. चंद्रभागेत पवित्र स्नान करून देहभान विसरलेल्या विठूभक्तांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, निराशा नाही. कोणताही भेदाभेद नाही. ना कोणी मोठा, ना कोणी लहान! जात-पात, भेदभाव सगळं गळून पडलंय. संत सोयराबाईंनी या वातावरणाचं अतिशय नितांत सुंदर वर्णन केलंय माउली… अवघा रंग एक झाला।
रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूपण गेले वाया।
पाहता पंढरीच्या राया ॥२॥ आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे, भारत नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करत आलेल्या या भक्तांबद्दल म्या पामरानं काय सांगावं माउली. या भक्तांचा हा काही साधासुधा प्रवास नाही, तर आत्म्यानं परमात्म्याच्या भेटीसाठी केलेली ही तपश्चर्याच आहे बरं. पावसाच्या सरी अंगावर झेलत, नाचत-गात आलेले हे वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले आहेत. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसे माझे मन वाट पाहे ॥२॥ असा भाव त्यांच्या हृदयात आहे. दर्शनाची रांग कितीही लांब असली तरी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदच आहे. कमी होत नाहीये. आणि ते पाहा…चंद्रभागेचं वाळवंट भक्तीनं आणखीनच फुलून गेलंय. कुणी भजनाचा ताल धरलाय, तर कुणी फुगड्या खेळतंय. याचं संत तुकारामांनी किती छान वर्णन केलंय…
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे ॥१॥ चला तर मग, आपणही मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने गजर करूया—बोला…पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय! आणि महाराज … दर्शनासाठी प्रत्येक जण आतुरलाय. कधी एकदा विठ्ठलाच्या चरणी लीन होतो, आपल्या माय-बापाला डोळे भरू पाहतो अशी त्यांची अवस्था झालीय. या वारीत आबालवृद्ध आहेत. पंढरपुराचं जणू काही गोकुळ झालंय. त्याचं कारणही संत जनाबाईंनी सांगून ठेवलंय. विठू माझा लेकुरवाळा ।
संगे गोपाळांचा मेळा ॥ १ ॥
निवृत्ती हा खांद्यावरी ।
ज्ञानेश्वराचा कर धरी ॥ २ ॥
सोपान तो पुढे चाले ।
मुक्ताईसी कडे केले ॥ ३ ॥
गोरा कुंभार मांडीवरी ।
चोखामेळा उभा द्वारी ॥ ४ ॥ आणि तो पाहा… मायबाप विठुरायाचे दर्शन घेऊन तृप्त झालेल्या वारकऱ्यांचा पहिला जथ्था आलाय. त्यांच्या चेहऱ्यावरील भावच त्यांच्या आनंदाचे त्यांना मिळालेल्या अपूर्व समाधानाचे वर्णन करतोय. पुढील वर्षी पुन्हा आषाढीला येण्याचा संकल्प करून परतीच्या वाटेवर निघालेल्या विठ्ठलभक्तांविषयी संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय – आम्ही जातो आमुच्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥ तर माउली असा हा भक्तीचा, पुन्हा पुन्हा हृदयात साठवावा असा सोहळा जपून ठेवत आम्हालाही निरोप द्यावा. जय हरी विठ्ठल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *