![]()
थेट परब्रह्माची पूजा करणे शक्य नसल्याने विविध माध्यमांची निर्मिती झाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार वेगवेगळ्या देवतांची उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत ते बोलत होते. शास्त्री महाराज म्हणाले की, “इतके देव का?” या प्रश्नाचे उत्तर भारतीय संस्कृतीच्या व्यापकतेत दडलेले आहे. व्यायामशाळेत हनुमानाची पूजा केली जाते, तर शाळांमध्ये सरस्वतीची आराधना होते. विकृत प्रवृत्तीचा रक्तपात करण्यासाठी देवी महाकालीची उपासना केली जाते. हेच भारतीय संस्कृतीचे वैभवशाली रूप आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित या प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर चौथ्या दिवशी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला सुरू आहे. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी ‘निराश’ शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. संस्कृतमधील ‘निराश’ म्हणजे ‘एकही आशा शिल्लक नसलेला’ असा आहे, जो मराठीतील नकारात्मक अर्थापेक्षा वेगळा आहे. आपण सर्वांनी निराश व्हावे, म्हणजेच सर्व सांसारिक अपेक्षा सोडून द्याव्यात. जेव्हा मनुष्य अपेक्षांपासून मुक्त होतो आणि पूर्णपणे मोरयाच्या भक्तीत रमतो, तेव्हा तो उत्तरायणाच्या मार्गाला लागतो. उत्तरायणात जाणारा जीव मुक्तीचा अधिकारी मानला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
Source link
मनोवृत्तीनुसार देवतांची उपासना भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- शास्त्री महाराज:दगडूशेठ ट्रस्टच्या श्रीगणेश गीतेतील 'भक्तीयोगा' प्रवचनमालेत निरूपण