Headlines

पंढरपूरमध्ये खासदार धनंजय महाडिकांवरील पोस्टवरून राडा:सुस्ते गावात दोन गटांत फ्री-स्टाईल हाणामारी! परिसरात दहशतीचे वातावरण




पंढरपूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमातील राड्याची घटना ताजी असतानाच आता सुस्ते गावात दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी समाजमाध्यमांवर सुरू असलेली टीका-टिप्पणी आणि त्यातून एकमेकांना दिलेल्या आव्हानांमधून हा वाद पेटला, ज्याचे रूपांतर अखेर एका रक्तरंजित हाणामारीत झाले. या भयंकर घटनेमुळे सुस्ते गावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुस्ते गावात झालेली ही हाणामारी अत्यंत भयानक आणि थरारक होती. या हल्ल्यात डोळ्यांत मारण्याचा स्प्रे, फायटर आणि शरीराला गंभीर इजा पोहोचवणाऱ्या इतर घातक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या अचानक आणि हिंसक पद्धतीने झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच पळापळ उडाली असून, संपूर्ण परिसरात मोठी घबराट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाडिकांचे कट्टर समर्थक टार्गेटवर या हल्ल्यात खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक व भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तात्या मामा नागटिळक यांच्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यात तात्या मामा नागटिळक यांचा मुलगा आकाश नागटिळक, जावई युवराज चव्हाण, सख्खा भाऊ धनाजी नागटिळक व समर्थक रामदास चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले या घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यापैकी आकाश नागटिळक यांच्या डोळ्यालगत अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. परिणामी, त्यांना पुढील तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शाब्दिक चकमकीचे रूपांतर प्रत्यक्ष हाणामारीत खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादग्रस्त टीका-टिप्पणी आणि जुन्या राजकीय वैमनस्यातून हा संघर्ष उफाळून आल्याची जोरदार चर्चा सध्या सोलापूर आणि पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. समाजमाध्यमांवरील या शाब्दिक चकमकीचे रूपांतर प्रत्यक्ष हाणामारीत झाल्याने, या घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू मात्र, या गंभीर प्रकरणात नेमका वाद कोणत्या सोशल मीडिया पोस्टवरून झाला, प्रत्यक्ष हल्ला करणारे संशयित कोण होते आणि त्यांनी हल्ल्यासाठी कोणत्या विशिष्ट हत्यारांचा किंवा साधनांचा वापर केला, याबाबतची कोणतीही ठोस आणि अधिकृत माहिती पंढरपूर पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पोलिस प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची सध्या सखोल चौकशी केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *