Headlines

महापालिकेतच चोरी:स्थायी समिती सभागृहातून नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार लंपास; पालिका भवनातच चोरीचा धक्कादायक प्रकार




शहरातील सार्वजनिक ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना आता थेट मुंबई महापालिकेच्या इमारतीतच चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात एका नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार रुपये चोरीला गेल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वार्ड क्रमांक 56 मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या बाबतीत घडली आहे. त्या स्थायी समितीच्या सदस्यही आहेत. समितीची बैठक संपल्यानंतर त्या काही वेळासाठी जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी पर्स तपासली असता त्यामधील 20 हजार रुपये गायब असल्याचे समोर आले. महापालिकेची स्थायी समिती ही ‘तिजोरी’ म्हणून ओळखली जाते, कारण याच ठिकाणी आर्थिक निर्णय घेतले जातात. अशा ठिकाणीच चोरी होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. लक्ष्मी भाटिया यांनी या घटनेची तक्रार महापौर, विरोधी पक्षनेत्या तसेच स्थायी समिती अध्यक्षांकडे केली आहे. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर थेट प्रश्न उपस्थित करत, जेथे मोठे आर्थिक निर्णय होतात, तिथेच अशी घटना घडत असेल, तर सुरक्षेबद्दल काय बोलायचं? असा सवाल केला. या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे स्थायी समिती सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमका आरोपी कोण, याचा शोध घेणे सध्या कठीण झाले आहे. भाटिया यांनी सांगितले की, पर्स उघडी असल्याचे त्यांच्या सहकारी नगरसेविकेलाही दिसले होते. त्यांनी तत्काळ एम.एस. विभागातील अधिकाऱ्यांना तसेच सुरक्षा विभागाला याची माहिती दिली आहे. मात्र, सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासात अडथळे निर्माण होत आहेत. पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर दरम्यान, या घटनेवरून मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. जर सभागृहातच अशी परिस्थिती असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच महापालिकेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी ही घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्या ठिकाणी शहराच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब होते, त्या ठिकाणीच चोरी होणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *