Headlines

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यामध्ये रुग्णालयांत "पोर्टेबल एमआरआय’:मंत्री हसन मुश्रीफ यांची विधान परिषदेत माहिती




उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोर्टेबल एमआरआय मशीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या वैद्यकीय आणि शिक्षण विभागाची एक विशेष अभ्यास समिती लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे. या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये पोर्टेबल एमआरआय मशीनची व्यवस्था करण्यात येईल. “पोर्टेबल एमआरआय ही पारंपरिक एमआरआय यंत्रणेला पूर्णपणे पर्यायी व्यवस्था नाही. मात्र, गंभीर रुग्णांपर्यंत थेट व जलद सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचे महत्त्व मोठे आहे. म्हणूनच शासनाने याचे सादरीकरण पाहिले आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी सकारात्मक आल्यास पोर्टेबल एमआरआय प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर शासकीय रुग्णालयांमध्ये अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे. ३६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा देणार राज्यातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये एमआरआय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई आणि नागपूर येथील नामांकित कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने ही एमआरआय सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यापैकी १६ ठिकाणी सध्या काम प्रगतीपथावर असून, अनेक रुग्णालयांमध्ये सध्याची विद्यमान एम.आर.आय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *