मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चांना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेतील पक्षांतर्गत बैठकीत कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही, असा स्पष्ट दावा साटम यांनी केला
.
मुंबई भाजपच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत गेल्या चार-पाच महिन्यांच्या कामांचा आढावा घेण्यासोबतच आगामी सहा महिन्यांच्या कामांचे नियोजन करण्यात आले. मुंबईकरांनी भाजपवर सोपवलेली जबाबदारी एक संघ म्हणून पार पाडण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत वादाबाबत काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांवर अमित साटम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत कोणताही वाद झाला नाही
अमित साटम म्हणाले की, दोन्ही बैठकींना आपण स्वतः उपस्थित होतो आणि बैठकीचे नेतृत्वही आपणच केले. माध्यमांमध्ये ज्या प्रकारे बैठकीतील वादाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या, तशी कोणतीही घटना बैठकीत घडलेली नाही. “बैठकीत काय चर्चा झाली, याचा अधिकृत स्रोत मी स्वतः आहे. त्यामुळे बैठकीत झालेली चर्चा माझ्यासमोरच झाली आहे. माध्यमांनी अंदाजाच्या आधारे बातम्या करण्यापेक्षा संबंधितांकडून माहिती घेऊन अधिकृत बातमी द्यावी,” असे आवाहन साटम यांनी केले.
महापौर, शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याच्या वृत्तावरही त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. मतभेद असणे आणि वाद होणे यात फरक असल्याचे सांगत काम करण्याच्या पद्धतीवर वेगवेगळी मते असू शकतात, पण त्याला पक्षांतर्गत संघर्ष म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणतीही समन्वय समिती स्थापन केलेली नाही
मुंबई महापालिकेतील कथित अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपकडून स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याच्या चर्चेलाही अमित साटम यांनी नकार दिला. “अशा प्रकारची कोणतीही समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली नाही. कारण पालिकेत अशा प्रकारचा कोणताही वादच नाही. काम करताना मतभेद होऊ शकतात. एखाद्या विषयावर निर्णय घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. मात्र, त्याला वाद किंवा खडाजंगी म्हणता येणार नाही,” असे साटम यांनी सांगितले.
स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग पुन्हा होणार नाही
मुंबई महापालिकेच्या कारभारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पारदर्शकता असल्याचे सांगत अमित साटम यांनी पूर्वीच्या कारभारातील कथित ‘अंडरस्टँडिंग’वरही भाष्य केले. काही अधिकारी किंवा विरोधी पक्षातील काही नगरसेवक आणि नेत्यांमध्ये पूर्वी असलेली ‘अंडरस्टँडिंग’ आता बंद झाल्यामुळे काही जण अस्वस्थ झाले आहेत. काही लोकांकडून पुन्हा पूर्वीसारखी व्यवस्था सुरू करण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा साटम यांनी केला.
“आमच्या काही नेत्यांना खासगीरित्या भेटून पूर्वीसारखे सुरू करा, अशी विनंती केली जात आहे. विरोधी पक्षातील दोन नेत्यांनी स्वतः मला फोन करून याबाबत विचारणा केली होती. मात्र, मी त्यांना स्पष्ट नकार दिला,” असा दावा साटम यांनी केला. सभागृह नेते आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांशीही विविध माध्यमांतून संपर्क साधून अशा प्रकारची ‘अंडरस्टँडिंग’ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.
“कितीही फेक नरेटिव्ह पसरवले, कितीही आरोप केले तरी स्टँडिंग कमिटीची कोणतीही अंडरस्टँडिंग पुन्हा सुरू होणार नाही. मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीनेच चालवला जाईल,” असा स्पष्ट इशारा साटम यांनी दिला.
सर्व खरेदी ‘जेम’ पोर्टलवरूनच
महापालिकेच्या खरेदी प्रक्रियेबाबतही साटम यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. सर्व खरेदी प्रक्रिया ‘जेम’ म्हणजेच सरकारी ई-मार्केटप्लेसच्या माध्यमातूनच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पूर्वीच्या पद्धतीतून लाभ घेणाऱ्या काही घटकांचे ‘मीटर बंद झाले’ असून ते पुन्हा सुरू होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
गेल्या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांत न झालेल्या स्वरूपाची कामे करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला. सुमारे १२०० कोटी रुपयांची कंत्राटे रद्द करण्यात आली, जेम पोर्टलचा वापर सुरू करण्यात आला आणि विद्यार्थ्यांसाठी संविधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करणार
मुंबई भाजपच्या नगरसेवकांना बैठकीत महापालिकेच्या माध्यमातून झालेले चांगले निर्णय आणि विकासकामे मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे साटम यांनी सांगितले. “मुंबईकरांनी आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करणे आवश्यक आहे. पक्षाची प्रतिमा खराब होईल, असे कोणतेही कृत्य करू नका,” अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशमूर्तीवर अंड फेकल्याच्या घटनेवर साटम आक्रमक
दरम्यान, मुंबईतील गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान गणपतीच्या मूर्तीवर अंड फेकल्याच्या कथित घटनेवरही अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि स्थानिक पोलिस उपायुक्तांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा तपास सुरू असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तपास लवकर पूर्ण करून आरोपी समोर येतील, असा दावा साटम यांनी केला.
मात्र, या घटनेवरून त्यांनी विरोधकांवरही गंभीर आरोप केले. देशात आणि समाजात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधी शक्तींकडून होत असल्याचा आरोप करत अशा समाजविघातक घटकांना विरोधकांच्या भूमिकेमुळे बळ मिळत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांवर त्यांनी यासाठी जबाबदारी निश्चित केली.
फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य टाळले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने सुरू असलेल्या दिल्ली दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात नियुक्ती होण्याची चर्चा आहे. याबाबत साटम यांना विचारण्यात आले असता त्यांनी हा केंद्रातील पक्षसंघटनेशी संबंधित विषय असल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला.
गेल्या सहा महिन्यांत मोठे बदल
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेख करत साटम यांनी महापालिकेतील गेल्या सहा महिन्यांच्या कामांचा आढावा घेतला. गेल्या ४२ वर्षांत प्रथमच मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाल्यानंतर मोठे बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई, मोठ्या किमतीची कंत्राटे रद्द करणे, जेम पोर्टलचा वापर, संविधानिक मूल्यांचा अभ्यासक्रम आणि मुंबई महापालिकेच्या शाळेत एआय व रोबोटिक्स प्रयोगशाळा उभारण्यासारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरही साटमांची माहिती
मुंबईच्या तलावांमध्ये सध्या सुमारे 95 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगत साटम यांनी पाणी कपातीबाबतही भूमिका स्पष्ट केली. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून १० टक्के पाणी कपात सुरू ठेवण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पुढील काळातील पर्जन्यमान आणि तलावांमधील पाणीसाठ्याची स्थिती पाहून हा निर्णय बदलला जाईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…
देवेंद्र फडणवीसांची दिल्लीला जाण्याची आवराआवर: कुंभमेळ्याच्या निधीत 27 कोटींचा भ्रष्टाचार? संजय राऊतांचा मोदी सरकारसह सरन्यायाधीशांवर निशाणा

नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार, भाजप आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला रवाना होणार असून, त्याआधी ते राज्यातील प्रलंबित कामे उरकून आपली माणसे महत्त्वाच्या पदांवर बसवण्याची आवराआवर करत असल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. यासोबतच नाशिकच्या कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार, विमानतळांचे खासगीकरण आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी