![]()
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी घेण्यात आलेली ‘नीट-यूजी’ परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द होऊन आता ती 21 जून रोजी नव्याने घेतली जाणार आहे. या परीक्षेला झालेल्या विलंबामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशांवरही परिणाम होईल अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या चर्चांना पूर्णविराम देत, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया नियोजित वेळेतच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले असून, विद्यार्थी आणि पालकांनी याबाबत मनात कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन केले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्याचा फटका अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला बसणार असल्याचे वक्तव्य केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याशिवाय, नीटच्या पुनर्परीक्षेमुळे या प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार असल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते. मात्र, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आता यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, प्रवेश प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नसून ती नियोजित वेळेतच पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देताना सीईटी कक्षाने सांगितले आहे की, महाराष्ट्रात नीट परीक्षेचे गुण केवळ 9 विशिष्ट अभ्यासक्रमांसाठीच ग्राह्य मानले जातात. तसेच, हे विशिष्ट अभ्यासक्रम राज्यातील केवळ 17 शासनमान्य संस्थांमध्येच उपलब्ध आहेत. त्यामुळे या मर्यादित जागांचा अपवाद वगळता, राज्यातील इतर सर्वसाधारण अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर नीट परीक्षेच्या विलंबाचा कोणताही परिणाम होणार नसून प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशांसाठी एमएचटी-सीईटी आणि नीट या दोन्ही परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात. या प्रवेश प्रक्रियेत 85 टक्के जागा राज्याच्या सीईटी गुणांच्या आधारे भरल्या जातात, तर उर्वरित 15 टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून नीट परीक्षेच्या गुणांवर भरल्या जातात. सद्यस्थितीत नीट-यूजी परीक्षा लांबणीवर पडली असून, 21 जून रोजी होणाऱ्या या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे एमएचटी-सीईटीचा निकालही अद्याप लागला नसून तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. नीट परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यावर स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ नीट परीक्षेचे गुण आवश्यक असलेले 9 विशिष्ट अभ्यासक्रम वगळता, राज्यातील उर्वरित सर्व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ‘एआयसीटीई’च्या (AICTE) नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू राहील. बहुतांश प्रवेश (85 टक्के) हे राज्याच्या सीईटीवर आधारित असल्याने ही प्रवेश प्रक्रिया कोणत्याही विलंबाविना, वेळेतच पार पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. 9 विशिष्ट अभ्यासक्रम कोणते? कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड इंजिनिअरिंग, लेदर इंजिनिअरिंग, पॅकेजिंग टेक्नोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नोलॉजी, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, टेक्सटाइल केमिस्ट्री, हे ते 9 विशिष्ट अभ्यासक्रम आहेत.
Source link
महाराष्ट्रात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार:'NEET'च्या विलंबाचा कोणताही परिणाम होणार नाही, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा