Headlines

महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे




विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या गैरहजेरीची दखल घेत ‘आपल्यात खरोखर एकी आहे का?’ अशी चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या पक्षाचे किती आमदार गैरहजर? मविआच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या 23 पैकी 16 आमदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये काँग्रेसचे 6 आमदार- नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, असलम शेख, विश्वजीत कदम, विकास ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे 5 आमदार- जयंत पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, अभिजित पाटील आणि आणखी एक. याशिवाय शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 आमदार- सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील आणि संजय दरेकर यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेत्यांची गैरहजेरीची कारणे काय? जयंत पाटील म्हणाले, “बैठक आधी 23 तारखेला होणार होती, ती अचानक 24 तारखेला निश्चित करण्यात आली. मी एक-दीड महिन्यांपूर्वीच दोन लग्नांना उपस्थित राहण्याची कमिटमेंट दिली होती आणि 24 तारीख ही लग्नाची तिथी असल्याने मला तिथे जाणे भाग होते. मी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना याची पूर्वकल्पना दिली होती. लग्नाच्या तिथीमुळे अनेक आमदार आपल्या मतदारसंघात व्यस्त असतील.” दुसरीकडे, नाना पटोले म्हणाले, वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित होतो. तर विजय वडेट्टीवार म्हणाले, तब्येत बरी नसल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. आमदारांनी दिले स्पष्टीकरण; आम्ही गद्दारी करणार नाही गैरहजर असलेल्या इतर आमदारांनीही माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. शिवसेना उबाठाचे आमदार सुनील राऊत म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील सूर्यानगर येथे पावसाने 300 मीटरची संरक्षक भिंत कोसळली होती. नुकसानग्रस्त भागात मदतकार्यासाठी मला तिथे थांबणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. पण बैठकीला गैरहजर राहिलो याचा अर्थ आम्ही गद्दारी करणार असा होत नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच आहोत.” काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे म्हणाले, “माझ्या पूर्वनियोजित वैयक्तिक कामामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही आणि तसे मी ‘सीएलपी’ कार्यालयाला कळवले होते. सगळे आमदार मविआसोबतच आहेत, आम्ही रोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करत आहोत. त्यामुळे आमच्या एकजुटीची कोणीही चिंता करू नये.” मविआमध्ये खरोखरच ‘एकी’चा अभाव? एकीकडे आमदार आणि नेते वैयक्तिक कारणांचे किंवा मतदारसंघातील कामांचे स्पष्टीकरण देत असले तरी, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच बोलावलेल्या एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला 23 आमदारांची एकाच वेळी दांडी मारणे ही बाब साधी नाही. जयंत पाटील आणि इतर नेते एकजुटीचा दावा करत असले तरी, युवा नेते रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवनात सातत्याने एकाकी आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांना मविआच्या इतर नेत्यांची अपेक्षित साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, पहिल्याच बैठकीला तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याने मविआच्या समन्वय आणि एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पुढील काळात विरोधक सभागृहात सरकारला कसे कोंडीत पकडतात, यावरच मविआची खरी ताकद स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *