![]()
दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात संशयित असलेल्या भोंदू कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातला नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात न्यायालयाने हा दिलासा दिला असून, एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार कोपळकर यांनी हा आदेश दिला. न्यायालयाने दिलेल्या आदेशात या प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करत हा वाद मुख्यतः दिवाणी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. 22 वर्षांनंतर दाखल झाला गुन्हा या प्रकरणातील कथित जमीन व्यवहार 2004 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. मात्र, तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर म्हणजे 2026 मध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. न्यायालयाने याची दखल घेताना इतक्या प्रदीर्घ कालावधीत तक्रारदार किंवा त्यांच्या भावांनी संबंधित खरेदीखत रद्द करण्यासाठी अथवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कोणत्याही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नसल्याचे नमूद केले. तसेच व्यवहाराच्या वेळी फसवणुकीचा अप्रामाणिक हेतू होता, असे तपासातून स्पष्टपणे समोर आलेले नसल्याचेही न्यायालयाने म्हटले. त्यामुळे केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. नोंदणीकृत दस्तऐवजांचा न्यायालयाने घेतला आधार न्यायालयाने आपल्या आदेशात संबंधित व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे प्रकरणाचा सर्वंकष विचार करून कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन देण्यात आला. मात्र, तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणे, चौकशीसाठी हजर राहणे आणि तपासात अडथळा आणू नये, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. शिर्डी प्रकरणात मात्र अद्याप दिलासा नाही दरम्यान, अशोक खरात ऊर्फ बोंदू बाबा याच्याविरोधातील कारवाई सुरू झाल्यानंतर त्याची पत्नी कल्पना खरातचाही कथित व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा आरोप समोर आला होता. याआधी शिर्डी पोलीस ठाण्यातही जमीन फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे सिन्नर प्रकरणात जामीन मंजूर झाला असला, तरी शिर्डीतील गुन्ह्यात अद्याप कोणताही कायदेशीर दिलासा मिळालेला नाही. 70 ते 80 दिवसांपासून फरार असल्याचा दावा या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कल्पना खरात गेल्या सुमारे 70 ते 80 दिवसांपासून फरार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांना अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सिन्नर प्रकरणात जामीन मंजूर झाला असला, तरी इतर प्रकरणांतील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे. भोंदू अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित जमीन व्यवहारांच्या प्रकरणांनी राज्यभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे. सिन्नरमधील प्रकरणात न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन हा कल्पना खरात यांच्यासाठी दिलासा मानला जात असला, तरी शिर्डीसह इतर प्रकरणांतील तपास, संभाव्य कारवाई आणि न्यायालयीन निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील कारवाई काय? कल्पना खरात देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी यापूर्वीच तिच्याविरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यामुळे आता पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तिचा मुलगा हर्षवर्धन आणि तिच्या दोन भावांचीही कसून चौकशी केली आहे. अशोक खरातसोबत १९९३ मध्ये विवाह पोलिस तपासातून कल्पना खरातच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील सुनीता शिंदे ही १९९३ मध्ये अशोक खरातशी विवाहबद्ध झाल्यानंतर ‘कल्पना खरात’ झाली. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळीत, तर माध्यमिक शिक्षण ठाणगावमधील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असलेल्या कल्पनाची सुरुवातीला केवळ पत्नी म्हणून असलेली तिची ओळख नंतर अशोक खरातच्या फसवणुकीच्या आणि बेनामी मालमत्तेच्या व्यवहारांमधील मुख्य भागीदारीत बदलली गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
Source link
भोंदू अशोक खरातच्या पत्नीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर:सिन्नर फसवणूक एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन, शिर्डी प्रकरणात मात्र अद्याप दिलासा नाही