Headlines

महिलांच्या आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही:महिला आरक्षणाच्या नावाखाली राज्यांची स्वायत्तता धोक्यात होती – विजय वडेट्टीवार




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक (संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक) लोकसभेत नामंजूर झाले आहे. यावरून आता राजकीय युद्ध पेटले असून, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आज फसला आहे,” अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाहीये. पण मोदींच्या छुप्या अजेंड्याला विरोधच राहील, असेही वडेट्टीवार म्हणाले. लोकसभेत या विधेयकावर ऐतिहासिक मतदान झाले. एकूण ५२८ खासदारांनी मतदानात भाग घेतला होता. घटनेनुसार, हे विधेयक मंजूर होण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश बहुमताची म्हणजेच ३५२ मते गरज होती. विधेयकाच्या बाजूने २९८ मते, तर विरोधात २३० मते पडली. अखेर ३५२ हा जादुई आकडा गाठण्यात सरकार अपयशी ठरल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक नामंजूर झाल्याचे घोषित केले. डेलिमिटेशनचा छुपा डाव? विजय वडेट्टीवार यांनी या विधेयकाच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘राजकारणा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “महिला आरक्षणाच्या बहाण्याने भाजपला मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) रेटून न्यायची होती. यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांची स्वायत्तता धोक्यात आली असती. मात्र, देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनी अत्यंत विवेकबुद्धीने मतदान करून राज्यांवरील हे संकट टळले आहे.” काँग्रेसचा आरक्षणाला नव्हे, विभाजनाला विरोध सोशल मीडिया पोस्टद्वारे भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षणाचा मुद्दा सर्वात आधी काँग्रेसनेच मांडला होता. “आमचा महिलांच्या आरक्षणाला विरोध नाही. पण महिलांच्या आडोशाने देशाला दोन भागांत विभागण्याचा जो नरेंद्र मोदींचा डाव होता, त्याला आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील,” असे त्यांनी निक्षून सांगितले. ओबीसी महिलांच्या रोषाचा इशारा भाजपने या विधेयकात ओबीसी महिलांना आरक्षण नाकारल्याचा आरोपही विजय वडेट्टीवारांनी केला आहे. “देशातील महिला आधीच महागाई, शिक्षण आणि सुरक्षेच्या प्रश्नांनी होरपळत आहेत. त्यातच भाजपने ओबीसी महिलांना आरक्षण नाकारून त्यांचा अपमान केला आहे. याचा रोष महाराष्ट्रासह देशभर भाजपला सहन करावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. ‘खोटे बोलू नका’; १६ एप्रिलच्या नोटिफिकेशनचा दिला दाखला विजेय वडेट्टीवार यांनी सरकारचे एक नोटिफिकेशन शेअर करत भाजपच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली. “जे लोक महिला आरक्षण मिळणार नाही म्हणून गळे काढत आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. महिलांसाठीचे ३३% आरक्षण हे १६ एप्रिल २०२६ पासून तांत्रिकदृष्ट्या लागू झाले आहे. सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी कशी करायची, हे ठरवायचे आहे. त्यामुळे भाजपचे समर्थन करायचे असेल तर करा, पण लोकांशी खोटे बोलू नका,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *