Headlines

'मी शिवसेना सोडलेलीच नाही':पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढण्यावरही दिले सूचक उत्तर




उद्धव ठाकरे यांना आठवडाभरात दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर आता या घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असा दावा करत त्यांनी एकीकडे तांत्रिक मुद्दा उपस्थित केला, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यावेळी त्यांनी भविष्यात वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार का? या प्रश्नालाही सूचक उत्तर दिल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ‘मी पक्ष सोडला नाही, तांत्रिक मुद्द्यावर योग्य वेळी बोलेन’ पत्रकार परिषदेत बोलताना सचिन अहिर म्हणाले, “मी पक्ष सोडलेला नाही. काही तांत्रिक मुद्दे आहेत. त्यावर योग्य व्यासपीठावर सविस्तर बोलेन. मला विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. या पदाची प्रतिष्ठा राखत मी भविष्यात काम करेन.” त्यांनी पुढे सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर एकनाथ शिंदे काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद आहे. शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे.” ‘कोळशातून हिरा ओळखण्याचे काम शिंदेंनी केले’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना सचिन अहिर म्हणाले, “शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची संधी दिली. त्यामुळे सामान्य कार्यकर्तादेखील या पदापर्यंत पोहोचू शकतो, हा संदेश गेला आहे. मी आता ग्रामीण भागातही शिवसेना पक्षसंघटना वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करणार आहे.” आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिर यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीकाही केली. “आपल्यासोबत असताना लोक चांगले असतात आणि पक्ष सोडल्यावर त्यांनाच नालायक ठरवण्याचा प्रयत्न होतो, हे दुर्दैवी आहे. इतर पक्षांमधून लोक आपल्याकडे येतात तेव्हा ते स्वार्थी वाटत नाहीत; पण तेच लोक दुसरीकडे गेले की त्यांच्यावर स्वार्थाचा शिक्का मारला जातो,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “काहींना वाटतं की आम्हीच सर्वकाही आहोत. पण मतदारसंघातील लोकांना माझं योगदान माहिती आहे. विधानसभा असो किंवा महापालिका, मी केलेलं काम त्या भागातील नागरिक आणि कार्यकर्ते सांगू शकतात.” ‘उद्धवजी आणि आदित्यजींनी दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली’ सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, “उद्धवजी आणि आदित्यजी यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, ती मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या कामाचे मूल्यमापन जनताच करेल.” त्यांनी स्पष्ट केले की, “सध्या माझ्यावर अनेक आरोप होत आहेत. त्यांना मी आत्ताच उत्तर देणार नाही. योग्य वेळी राजकीय व्यासपीठावर सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.” वरळीतून निवडणूक लढवणार? सूचक उत्तर पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांना २०२९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी थेट उत्तर टाळत म्हटले, “एकनाथ शिंदे माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील, ती मी पूर्ण ताकदीने पार पाडेन.” अहिर यांच्या या उत्तरानंतर भविष्यात वरळीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘मी पक्ष सोडलेला नाही’ म्हणण्यामागचं कारण काय? सचिन अहिर यांच्या “मी पक्ष सोडलेला नाही” या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्टीकरण दिले. शिंदे म्हणाले, “सचिन अहिर जेव्हा आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे होता. आजही पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली, असं तांत्रिकदृष्ट्या म्हणता येणार नाही.” या स्पष्टीकरणानंतर पक्षांतर कायद्याच्या अनुषंगाने पुढे कोणती कायदेशीर प्रक्रिया होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरेंना आठवडाभरात दुसरा मोठा धक्का याच महिन्यात ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांनीही महायुतीची साथ स्वीकारल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, अहिर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. वरळी आणि मुंबईतील कामगार संघटनांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या निर्णयाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन अहिर यांनी कामगार सेनेच्या पदाचा राजीनामा दिला असून महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी स्वीकारली आहे. मात्र, “मी पक्ष सोडलेला नाही” या त्यांच्या दाव्यामुळे त्यांच्या आमदारकीवर काय परिणाम होणार, ठाकरे गट कोणती कायदेशीर भूमिका घेणार आणि भविष्यात ते वरळीच्या राजकारणात कोणती भूमिका बजावणार, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *