![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातच भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चर्चेत आला आहे. रविवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात दिव्यांगांना जयपूर फूट आणि विविध सहाय्यक साधनांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या 110 नगरसेवकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी सुमारे 40 नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला पूर्वसूचना देण्यात आली होती. तसेच नगरसेवकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले होते. तरीही मोठ्या संख्येने नगरसेवक गैरहजर राहिल्याने भाजपच्या मनपा सत्तापक्षात याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. मनपा सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी याबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नोटीसमध्ये कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करण्याच्या सूचना नगरसेवकांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजप या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते आणि संबंधित नगरसेवकांवर पुढील कारवाई केली जाते का, याकडे नागपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिव्यांगांना जयपूर फूटसह विविध साहित्याचे वाटप दरम्यान, याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींना मोफत जयपूर फूट, कृत्रिम अवयव आणि विविध सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सहाय्यक साधनांमुळे सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले. कृत्रिम पाय, हात तसेच इतर कृत्रिम अवयव उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील अनेक कामे अधिक सहजपणे करता येतात, असे त्यांनी नमूद केले. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती 1975 पासून देशात आणि देशाबाहेर दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमध्ये श्रवणयंत्र, व्हीलचेअर, अंधांसाठी काठी आणि इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना मिळणारे मानधन वाढवून 2,500 रुपये करण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांना सन्मानाची संधी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्णबधिर मुलांसाठी 6 ते 8 लाखांचा उपचार खर्च सरकार करणार कर्णबधिर मुलांमध्ये लहान वयातच आवश्यक उपचार केल्यास त्यांची ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होऊ शकते, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांटसारख्या शस्त्रक्रिया महत्त्वाच्या असून, त्यासाठी साधारण 6 ते 8 लाख रुपयांचा खर्च येतो. हा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात राज्यभर सर्वेक्षण करून विशेषतः 10 वर्षांखालील कर्णबधिर मुलांचा शोध घेतला जाईल आणि आवश्यकतेनुसार योग्य वेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दिव्यांग व्यक्तींना दरमहा सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देणारी रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यासोबतच गृहनिर्माण आणि इतर योजनांमध्येही त्यांना प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या याच कार्यक्रमाला भाजपच्या सुमारे 40 नगरसेवकांनी गैरहजेरी लावल्याने आता पक्षाकडून त्यांच्याकडे खुलासा मागवला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अनुपस्थितीवर भाजप नेतृत्व कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… राज्यात पावसाचे पुन्हा कमबॅक :मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; काही भागांत गारपिटीची शक्यता राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील तब्बल १९ राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी:फडणवीसांच्या गृहजिल्ह्यातीलच प्रकार, आता 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्याची तयारी