![]()
अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य तुटले असून, वाढलेल्या गवतामुळे पायी फिरणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेले ओपन जीमचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटले आहे. उद्यानात ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढली असून, झाडांची छाटणी न केल्यामुळे उद्यानाला जंगलाचे स्वरूप आले आहे. एका बाजूचे कुंपणही तुटले आहे. पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने संपूर्ण परिसरात चिखल साचतो. जागोजागी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची पैदास वाढली असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. चालण्याच्या मार्गावर चिखल आणि गवत असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना चालणे अशक्य झाले आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक स्वाती कुलकर्णी, मिलींद बांबल, लवीना हर्षे आणि रतन डेंडुले यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात मोठे दवाखाने असल्याने सामान्य नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे नगरसेवकांनी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना विरंगुळ्यासाठी असलेल्या या एकमेव जागेच्या दूरवस्थेमुळे मनपा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्यानाची स्वच्छता करावी, तुटलेले जीम साहित्य दुरुस्त करावे आणि चिखलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मुधोळकर पेठ परिसरातील रहिवासी अनिल सामुद्रे यांनी केली आहे.
Source link
मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप