Headlines

मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा- मोहन भागवत:मानसिक मशागतीसाठी 'गुगल बाबा'ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर द्या




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुलांना मोबाईलऐवजी आजी-आजोबांकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. नागपूर येथे ‘सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या’ उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वीच्या काळी आजी-आजोबा नातवंडांना गोष्टी सांगून त्यांच्यावर नकळत संस्कार करत असत आणि कौटुंबिक मूल्यांची शिकवण देत असत. मात्र, आजच्या आधुनिक युगात कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक आजी-आजोबांना वृद्धाश्रमात राहावे लागत आहे. यामुळे पालक लहान मुलांच्या हातात थेट मोबाईल देऊन त्यांना ‘गुगल बाबा’च्या हवाली करत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे ताळतंत्र बिघडते आणि त्यांची मानसिक जडणघडण थांबते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. सरसंघचालकांनी आजच्या पिढीतील वाढती अस्वस्थता आणि ढासळत्या मानसिक आरोग्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे मुख्य साधन असल्याचे ते म्हणाले. गर्भावस्थेत असतानाच मानवाचे मज्जातंत्र आणि विचारतंत्र विकसित होते आणि पुढे मिळणाऱ्या अनुभवातून मन आकारास येते. बारावीत नापास झाल्याने आत्महत्या करणे किंवा किरकोळ कारणावरून घरातून पळून जाणे अशा घटना सर्रास घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे नवीन पिढीमध्ये जीवनाचा आणि संकटांचा खंबीरपणे सामना करू शकेल असे कणखर मन तयार होत नाहीये. घरातून आणि समाजात योग्य संवाद न मिळाल्याने मुलांमध्ये एकटेपणा वाढत असून, पालकांनी हा एकटेपणा दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना सरसंघचालकांनी आधुनिक मानसशास्त्राच्या मर्यादांवरही प्रकाश टाकला. ‘मॉडर्न सायकोलॉजी’ प्रामुख्याने पाश्चात्त्य देशांतून आली आहे, असे ते म्हणाले. आपल्या देशात आधीपासूनच पतंजली योगसूत्र आणि योगवासिष्ठ यांसारख्या ग्रंथांच्या माध्यमातून मनाची अतिशय पूर्ण आणि समग्र चिकित्सा उपलब्ध आहे, ज्यावर दुर्दैवाने फारसे संशोधन झाले नाही. मानवाचे खरे कल्याण करायचे असेल, तर पाश्चात्त्य आणि भारतीय विचारांचा अभ्यास करून आपल्या प्राचीन भारतीय शास्त्रांना जोडणारे एक परिपूर्ण ‘भारतीय मानसशास्त्र’ विकसित करण्याची आज गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *