Headlines

मोर्शीत गारपिटीचा तडाखा; खांब वाकले, झाडेही पडली:संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात‎




मोर्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मोर्शी शहरातील एसटी डेपो लगत अप्पर वर्धा कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावरील सहा विद्युत खांब वादळी वाऱ्यामुळे खालीपर्यंत वाकले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही दुकानांवरील टीनपत्रे उडून गेली. परिणामी, या परिसरातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली. राय कॉलनी परिसरात बोराएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. तसेच, सिंभोरा मार्गावरील श्रीराम कॉलनी येथे झाड कोसळून एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. वादळी पावसामुळे शहरातील व परिसरातील विद्युत पुरवठा दीड ते दोन तास खंडित झाला होता. हिवरखेड महसूल मंडळातील दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी पाळा, मायवाडी, भाईपूर आदी गावांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागातील संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी संत्र्यांची मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. झाडांवरील फळांना गंभीर इजा पोहोचली आहे. काही भागांत झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *