![]()
मोर्शी तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपूरच्या सीमेवरील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्त्याचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे आणि महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यावर तोडगा निघाला. सध्या या रस्त्याचे बांधकाम वेगाने सुरू असून, परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. हा वाद गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. सीमेवर एकाच शेतकऱ्याची दोन्ही गावांमध्ये शेती असल्याने त्याने एका ठिकाणी पाणंद रस्ता अडवला होता, ज्यामुळे रस्त्याचे काम थांबले होते. यामुळे मागील वर्षीच्या पावसाळ्यात परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. राज्य शासनाच्या ‘मातोश्री पाणंद रस्ते योजने’अंतर्गत मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षभरात अनेक शेतांना हक्काचे रस्ते मिळाले आहेत. आता कोपरा-अहमदपूर रस्त्याचे काम सुरू झाल्याने येणाऱ्या पावसाळ्यात शेतकऱ्यांना वाहतुकीची अडचण जाणवणार नाही. प्रशासनाच्या या गतीमान कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांनी तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
Source link
मोर्शीत दीड वर्षांपासूनचा पाणंद रस्त्याचा वाद मिटला:कोपरा-अहमदपूर पाणंद रस्त्याचे काम आता वेगाने सुरू