Headlines

यशवंत स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा:मनपाचा 5 लाख झाडे लावण्याचा संकल्प; योगपटूंचा सत्कार




नागपूर प्रतिनिधी: नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हजारो योगसाधक उपस्थित होते. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मनपाने पर्यावरण दिनापासून योगदिनापर्यंत शहरात “पर्यावरण संवर्धन पंधरवडा” अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेतील योगदानाबद्दल ग्रीन व्हीजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल आणि आमराई स्वच्छ करणाऱ्या वृक्षत फाऊंडेशनचे लोकेश व यश यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बाल योगसाधकांची चित्तथरारक प्रात्यक्षिके ठरली. अनिल मोहगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा योग असोसिएशनच्या बालसाधकांनी मानवी मनोरे सादर केले. तसेच, चक्रासन स्पोर्ट्स असोसिएशनने मार्गदर्शक गजानन लडी यांच्या नेतृत्वात बालकांनी अभिनव “चक्रासन रेस” करून उपस्थितांची मने जिंकली.

जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सचिव मिलिंद वझलवार यांनी निरोगी आयुष्यासाठी दररोज योगासने करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मंडळाचे राहुल कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी विविध योगासने सादर केली.
आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत पदके पटकावणाऱ्या कुशल इंगोले, यग्नेश वानखेडे, ओम डेहनकर, निसर्ग भगत आणि प्रशिक्षक संदेश खरे यांचा महापौरांच्या हस्ते मानाचा दुपट्टा व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याचवेळी, नागपूर शहरात 5 लाख झाडे लावण्याच्या मनपाच्या संकल्पांतर्गत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते योगसाधकांना मोफत रोपट्यांचे वाटप करण्यात आले. रोपटे घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *