![]()
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी आणि पीकविम्याचा प्रश्न सुटावा या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, चार दिवस उलटूनही सरकारने या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आणि तुपकर यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या आंदोलनाला आता अत्यंत हिंसक वळण लागले असून, मुंबईत मंत्रालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा आणि विदर्भासह राज्यभरात सरकारी कार्यालये व टोलनाके पेटवून देण्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविकांत तुपकरांचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आज मुंबईच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मंत्रालयाबाहेर सुतळी बॉम्बचा थरार मंत्रालयासमोरील एका झाडावर तुपकरांचा एक कार्यकर्ता हातात सुतळी बॉम्बने भरलेली बॅग घेऊन चढला. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलिस पुढे सरसावले असता, त्याने थेट पोलिसांच्या दिशेने सुतळी बॉम्ब फेकला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब फेकल्यानंतर हा कार्यकर्ता झाडावरच राष्ट्रगीत गाऊ लागल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली. गेटवे ऑफ इंडियावर समर्थकांनी समुद्रात झोकून दिले दुसरीकडे, लातूर आणि इतर जिल्ह्यांतून आलेल्या मनसे आणि तुपकर समर्थकांनी थेट ‘गेटवे ऑफ इंडिया’ गाठले. ‘मोदी सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी थेट अरबी समुद्राच्या पाण्यात उड्या घेतल्या. पोलिसांनी तात्काळ बोटींच्या साहाय्याने या कार्यकर्त्यांना बाहेर काढले आणि कुलाबा पोलिस ठाण्यात ताब्यात घेतले. जशास तसे उत्तर देऊ, महाराष्ट्र पेटेल – तुपकरांचा इशारा कुलाबा पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनस्थळावरून रविकांत तुपकर यांनी सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. “मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना कुलाबा पोलिसांनी विनाकारण डांबून ठेवले आहे. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत, पण त्यांची साधी वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जखमींवर तातडीने उपचार करून सर्वांची बिनशर्त सुटका करा; अन्यथा राज्यभरातून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेची जी परिस्थिती निर्माण होईल, त्याला केवळ शासन आणि प्रशासनच जबाबदार असेल,” असे ते म्हणालेत. सरकारी कार्यालये आणि टोलनाके भस्मसात रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत चालल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. २४ तासांत राज्याच्या विविध भागांत तोडफोड आणि आगीच्या घटना घडल्या आहेत. तलाठी कार्यालयांवर हल्ला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि हिवरा आश्रम येथील तलाठी कार्यालये अज्ञात आंदोलकांनी रात्रीच्या सुमारास पेटवून देण्याचा प्रयत्न केला. SDO कार्यालयाचे प्रवेशद्वार जाळले खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. टोलनाके केले लक्ष्य जालना-खामगाव मार्गावरील चिखली जवळील टोलनाका आणि पुणे-नागपूर महामार्गावरील मुरादपूर फाटा येथील बंद पडलेला टोलनाका आंदोलकांनी पूर्णपणे पेटवून दिला. तुपकरांची प्रकृती खालावली; “माझा तळतळाट लागेल”, आईचा उद्विग्न आक्रोश सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य प्रमाणापेक्षा खूपच खाली आली असून, त्यांना तीव्र अशक्तपणा, चक्कर येणे आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. मुलाची ही अवस्था पाहून तुपकरांच्या वृद्ध आईने अत्यंत भावुक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मायबाप म्हणवून घेणारे सरकार सध्या उंटावरचे शहाणे होऊन बसले आहे. माझ्या मुलाच्या जिवाला जर काही झाले, तर या सरकारला माझा तळतळाट लागेल आणि हे सरकार कधीच टिकणार नाही.”
Source link
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण:कार्यकर्ते आक्रमक; मंत्रालयाबाहेर पोलिसांवर सुतळी बॉम्बफेक, तर गेटवेवर समुद्रात उड्या