![]()
पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. मागील तीन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दौंड आणि बारामती उपविभागात एकूण सात गावठी पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पहिल्या कारवाईत, बारामती येथील रुई पाटीजवळ गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यात ओम उर्फ लाला राजेंद्र कुदांडे (वय २०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५० हजार २०० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई इंदापूर एस.टी. स्टँडजवळ करण्यात आली. येथे शाहरुख इस्माईल मुजावर (वय २५, रा. बावडा, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्या अंगझडतीत ५० हजार ८०० रुपयांचे दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिसरी कारवाई यवत परिसरातील पाटस येथील चांगुना हॉटेलजवळ झाली. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (इलाहाबाद) येथील रहिवासी असलेला आरोपी सनी कुमार केसरी प्रसाद (वय २५) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १८ हजार ५०० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई:4 गावठी पिस्तूल, 6 काडतुसे जप्त; 3 आरोपींना अटक, 1.19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत