Headlines

नेत्रशल्यचिकित्सा विभागाला मिळणार 14 कोटींचा निधी:अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांची घोषणा; रुग्णसेवेचा दर्जा उंचावणार




छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाला लवकरच सुमारे १४ कोटी रुपयांची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होणार आहेत. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ही माहिती दिली. या निधीमुळे विभागातील निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा अधिक सक्षम होऊन रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे डॉ. सुक्रे यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर, रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागातर्फे बाह्यरुग्ण विभाग क्रमांक १०७ येथे नेत्रदान पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा साजरा केला जातो. कॉर्नियल अंधत्वामुळे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना नेत्रदानामुळे पुन्हा दृष्टी मिळण्याची संधी मिळते. त्यामुळे समाजातील अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचा भाग म्हणून पोस्टर व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिल्पा आसेगावकर, बालरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. स्मिता मुंदडा, शल्यचिकित्सा विभागाच्या प्राध्यापक डॉ. अनिता कंडी आणि नेत्ररोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. वैशाली उने यांनी केले. नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. अर्चना पाटील वरे यांनी आपल्या मनोगतात नेत्रदानाचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी सुक्रे यांनी नेत्रशल्यचिकित्सा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, रुग्णसेवा व जनजागृतीपर उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, विभाग अधिक प्रगत व अत्याधुनिक करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाला नेत्रशल्यचिकित्सा विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. तपन जक्कल, सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेश सोनपेठकर, डॉ. अनुपमा कोकाटे, डॉ. सनीरा वळसे, डॉ. सोहम पाल व डॉ. इमरान खान यांच्यासह विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते. उपअधिष्ठाता डॉ. गर्कल, डॉ. विनोद मुंदडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, वार्धक्य शास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शैलजा राव, स्त्री रोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. सोनाली देशपांडे, परिसेविका संजीवनी गायकवाड यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या कनिष्ठ निवासी डॉ. सोनिया हाके यांनी केले, तर सहाय्यक प्राध्यापक डॉ. सरोश सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *