Headlines

अवैध सावकारीवर कारवाई, परतवाडा-धोतरखेड्यात 4 पथकांचे छापे:कोरे स्टॅम्प, धनादेश आणि खरेदीखतांसह 69 संशयास्पद दस्तऐवज जप्त




परतवाडा शहर आणि धोतरखेडा परिसरात सर्रास सुरू असलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. येथील जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या आदेशानुसार गठित चार विशेष पथकांनी पोलीस ताफ्यासह वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश, इसारचिठ्ठी आणि खरेदीखतांसह एकूण ६९ संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. अचलपूरच्या सहायक निबंधक कार्यालयाकडे अवैध सावकारी संदर्भात अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने सकाळी साडेदहाच्या सुमारास ही मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्या पथकाने सकाळी ११.१५ वाजता विद्यानिकेतन कॉलनी, परतवाडा येथील संजय ओंकारराव बोरखडे यांच्या घरी धाड टाकली. सहायक निबंधक प्रीती धामणे (तिवसा) यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने कोऱ्या स्टॅम्पसह २ संशयास्पद दस्तऐवज जप्त करून सील केले. दुसऱ्या पथकाने गोपाळ नगर, गौरखेडा रोड येथील सुनील पांडुरंगजी नेमाडे यांच्या निवासाची झडती घेतली. सहायक निबंधक स्वाती गुडधे (मोर्शी) यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने सकाळी ११ ते दुपारी २.४० या वेळेत कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५१ संशयास्पद दस्तऐवज हस्तगत करण्यात आले. यामध्ये कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश, उसनवार चिठ्ठी, करारनामा, स्थावर मालमत्ता खरेदीखत आणि इसारचिठ्ठीचा समावेश आहे. सहायक निबंधक परेश गुल्हाने (अचलपूर) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धोतरखेडा येथील दादाराव साहेबराव वरघट यांच्या घरी सकाळी ११.२१ ते दुपारी २ च्या दरम्यान कारवाई केली. या ठिकाणाहून १६ संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यात भाडे करारनामा, इसारचिठ्ठी, खरेदीखत, गाव नमुना ८ (अ) आणि ७/१२ चा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ मधील कडक तरतुदींनुसार तपासणी केली जाणार आहे. विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन व जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अचलपूरचे सहायक निबंधक परेश गुल्हाने पुढील कायदेशीर पडताळणी व चौकशी करणार आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, सहायक निबंधक आशिष चर्जन (वरुड) यांच्या नेतृत्वातील एका पथकाने संतोषी नगर, परतवाडा येथील अशोक पांडुरंगजी नेमाडे यांच्या घरी सकाळी १०.५० ते दुपारी १ या वेळात झडती घेतली. मात्र, या ठिकाणी कोणतेही संशयास्पद दस्तऐवज आढळून आले नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *