![]()
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी मोठे विधान केले आहे. बड्या उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ (निर्लेखित) केल्याने देशातील बँकिंग व्यवस्था आणि सामान्य लोकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. योजनांसाठी सरकारकडे निधी नसतानाही हे दुटप्पी धोरण राबवले जात असल्याचे ते म्हणाले. सुखराज यांनी बँकांच्या ‘मिनिमम बॅलन्स’ धोरणावरही प्रकाश टाकला. बँकांनी खात्यात किमान शिल्लक न ठेवणाऱ्या सामान्य ग्राहकांकडून तब्बल १६ हजार कोटी रुपयांची दंड वसुली केली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांकडून ही मोठी रक्कम कापली जात असून, त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता हा भुर्दंड लादला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. एका बाजूला बड्या उद्योजकांची हजारो कोटींची कर्जे निर्लेखित केली जातात, तर दुसऱ्या बाजूला सामान्य ग्राहकांकडून लहान चुकांसाठी दंड वसूल केला जातो. या दुटप्पी धोरणामुळे सर्वसामान्य लोकांवर थेट आर्थिक परिणाम होत असून, या गंभीर विषयावर कोणीही ठोसपणे बोलत नसल्याचे सुखराज यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी वरुण सुखराज यांच्या मताला दुजोरा दिला. देशात मोठ्या प्रमाणावर कर्जे माफ किंवा निर्लेखित केल्याने संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचे तुळजापूरकर यांनी सांगितले. बँका आणि सामान्य ग्राहक यांच्यातील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही गंभीर समस्या तातडीने सोडवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Source link
'राईट ऑफ'मुळे सामान्य लोकांवर विपरीत परिणाम:निधी नसतानाही सरकारकडून दुटप्पी धोरण, लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांचे मत