![]()
महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांच्यात पडद्यामागे जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे आक्रमक आमदार व मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे दोघेही या प्रतिष्ठेच्या पदासाठी आग्रही राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, आता खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एक अत्यंत सामंजस्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण विधान करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादावर माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता आदिती तटकरे यांनी अतिशय संयत भूमिका मांडली. आदिती तटकरे म्हणाल्या, “आता या संदर्भातील अंतिम निर्णय आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवला आहे. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले, तरी माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छाच असतील; हे मी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. आमच्या सर्वांसाठी वैयक्तिक पदापेक्षा जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास अधिक महत्त्वाचा आहे. पालकमंत्री हे केवळ एक पद झाले, पण आज जिल्ह्यामध्ये दोन मंत्री काम करत आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्यालाच मी एक लोकप्रतिनिधी म्हणून अधिक प्राधान्य देते.” ‘लाडकी बहीण’वर दिली स्पष्टोक्ती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून राज्यातील तब्बल ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. यावर क्रीडा व महिला बालविकास मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण दिले. अर्ज बाद झालेल्या अनेक महिलांच्या मूळ कागदपत्रांमध्ये आणि आधार कार्डच्या ‘ई-केवायसी’ प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारी कुटुंबे आणि घरात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असलेल्या अपात्र महिलांना या योजनेच्या निकषानुसार वगळण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. अद्यापही ज्या पात्र महिलांना लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी राज्यातील सर्व डीबीटी केंद्रांना स्पष्ट निर्देश देण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली. कोणावरही अन्याय होणार नाही! “आम्ही राज्यातील कोणत्याही पात्र महिलेला या योजनेपासून वंचित ठेवत नसून, जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. केवळ लाडकी बहीणच नव्हे, तर ‘नमो शेतकरी योजना’ आणि ‘संजय गांधी निराधार योजना’ यांसारख्या इतर शासकीय योजनांचा समन्वय साधला जात आहे. जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसेल, तर तिला संजय गांधी निराधार योजनेचा तरी लाभ मिळवून देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,” असेही तटकरे यांनी शेवटी नमूद केले. हे ही वाचा… अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा:म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’ राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी महायुतीत जाणे किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, या सर्व चर्चांना आता खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पंढरपूर येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या शेतकरी अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याची किंवा अर्थमंत्रिपद स्वीकारण्याची कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा…
Source link
रायगड पालकमंत्री पदाच्या वादावर अदिती तटकरेंची मवाळ भूमिका:भरत गोगावलेंना दिल्या थेट शुभेच्छा, 'लाडकी बहीण'वर दिली स्पष्टोक्ती