Headlines

राजकमल चौकात सोलर दिवे तोडले:उड्डाणपुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य; सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष




अमरावती शहरात सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड होत आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बसवलेले पथदिवे, रस्ता दुभाजकांमधील शोभेचे दिवे, विजेचे खांब आणि सोलर लाईट्सची अनावश्यक तोडफोड केली जात आहे. यासोबतच, शहरातील उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागा आणि खांबांजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जात आहे. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. शहरातील प्रमुख मार्ग, दुभाजक आणि उड्डाणपुलांखालील परिसर सध्या अनेक समस्यांनी वेढला आहे. अमरावती शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात रात्रीच्या वेळी दुभाजकांमधील शोभेचे दिवे, सोलर लाईट्सच्या प्लेट्स आणि विजेच्या खांबांची तोडफोड करण्यात आली आहे. याच चौकातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील खांबांजवळ नागरिक आणि स्थानिक व्यापारी उघड्यावर कचरा टाकत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या कचऱ्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. महापालिकेचे कार्यालय याच उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला असूनही, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू आहे. कोणताही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सामान्य जनतेने भरलेल्या करातून उभारलेल्या या सुविधांची तोडफोड झाल्यामुळे प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या वाढत्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. उड्डाणपुलांखाली आणि प्रमुख रस्ता दुभाजकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. उड्डाणपुलांखाली साचलेला कचरा वेळेवर उचलून त्या जागांचे सुशोभीकरण करावे. तिथे लहान उद्याने, पेव्हिंग ब्लॉक किंवा शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था केल्यास कचरा टाकण्यास प्रतिबंध बसेल. याशिवाय, अनेकदा उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत भटक्या नागरिकांची वसाहत दिसून येते. तिथेच निवास करणे, मांसाहारी अन्न शिजवणे आणि घाण करणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडे तक्रारी आल्यावर एक-दोन दिवसांसाठी त्यांना तेथून हटवले जाते, पण काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा तशीच होते. यामुळे अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *