Headlines

राज्यात अंधश्रद्धा वाढीसाठी सरकारचे धोरण जबाबदार:अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप




अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये वाढ होण्यास हे धोरण जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. प्रा. मानव यांनी निधी वाटपातील बेकायदेशीरपणावर बोट ठेवले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी सरकारने सात संस्थांना १ कोटी ७७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, या निधीचे वाटप बेकायदेशीर असून, सरकार कायदा प्रभावीपणे राबवण्याऐवजी केवळ चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला मधुकर कांबळे, सुनील भालेराव, पांडुरंग सावंत आणि संध्या बागवे हे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकमधील स्वयंघोषित बाबा अशोक खरात याने केलेल्या महिलांच्या शोषणाचा आणि कोट्यवधींच्या फसवणुकीचा दाखला देत प्रा. मानव म्हणाले की, अशा भोंदू बाबांना सत्ताधारी नेत्यांचा आणि प्रशासनाचा वरदहस्त असतो. मुख्यमंत्री किंवा जबाबदार मंत्री स्वतः ज्योतिषांच्या किंवा बाबांच्या दरबारी गेल्यास, समाजातील सामान्य माणसाचा अशा भोंदूंवरचा विश्वास वाढतो, असे त्यांनी नमूद केले. गृहखाते केवळ सोयीनुसार कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बागेश्वर बाबांसारख्या व्यक्तींवर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात वाढत चाललेली अंधश्रद्धा ही केवळ वैचारिक नसून ती एक सामाजिक विकृती बनत चालली आहे, असे प्रा. मानव यांनी म्हटले. या विरोधात त्यांनी ‘वृक्ष तिथे छाया… बुवा तिथे बाया’ हे विशेष जनजागृती अभियान सुरू केले आहे. या मोहिमेद्वारे ते ठिकठिकाणी जाऊन भोंदूगिरी आणि त्यामागे लपलेली गुन्हेगारी उघड करत आहेत. या जनजागृतीचा भाग म्हणून पुणे येथील टिळक स्मारक मंदिर येथे रविवार, दिनांक १८ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *