Headlines

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय!:आगामी 4 दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार; विदर्भाला यलो अलर्ट, तर मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत




गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. पूर्व भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून, 18 जुलैपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात अद्यापही चिंताजनक परिस्थिती कायम आहे. 18 ते 23 जुलैदरम्यान राज्यातील मान्सून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ विदर्भातील स्थिती: प्रादेशिक हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. भंडारा आणि गोंदिया: भंडारा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रखडलेल्या शेतीकामांना वेग आला आहे. गोंदिया जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली असून भात लागवडीच्या कामांना गती मिळाली आहे. कोकण आणि महामुंबई: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि नवी मुंबईच्या अंतर्गत भागातही शनिवार-रविवारी पावसाचा जोर वाढणार आहे. पालघरमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या रिपरिपमुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरातही सात दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केले आहे. मराठवाडा अद्यापही तहानलेलाच; परभणीत भीषण परिस्थिती राज्यात एका बाजूला मुसळधार पाऊस सुरू असताना, मराठवाडा मात्र अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परभणीत 20 दिवसांचा खंड: यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने मोठी उघडीप दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 258 मिमी पाऊस होणे अपेक्षित होते, मात्र केवळ 135 मिमी (तोही तुटक) पाऊस झाला आहे. विहिरी आणि बोअर कोरडे पडल्याने पिके वाळू लागली असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. “शेतातील परिस्थिती पाहून आम्हाला झोप येत नाही, सरकारने आता मदत द्यावी,” अशी आर्त हाक येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. बीडच्या परळीत दिलासा: बीड जिल्ह्यातील परळी शहर आणि परिसरात मात्र 15 दिवसांच्या खंडानंतर रात्री तासभर दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिकांना तात्पुरती नवसंजीवनी मिळाली असली, तरी शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि पुढील आठवड्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर ओडिशा आणि झारखंड भागात केंद्रित आहे. येत्या 24 तासांत ही प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असून ती महाराष्ट्रापासून दूर जात आहे. त्यामुळे राज्यात पुढील आठवड्यात सार्वत्रिक आणि मोठा पाऊस होण्यासाठी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातून मान्सूनला गती देणारी नवीन प्रणाली सक्रिय होणे आवश्यक आहे. 18 आणि 19 जुलै रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, एकूणच जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचे चित्र दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *