![]()
स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून निष्पाप भक्तांना आणि श्रीमंत व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘भोंदू कॅप्टन बाबा’ याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठा कायदेशीर फास आवळला आहे. ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात 42.88 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल 3 हजार पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात भोंदू बाबा अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह एकूण सहा जणांना आरोपी करण्यात आले असून, तब्बल 37 साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. अंधश्रद्धेचा बाजार आणि भक्तांची आर्थिक लूट ईडीने आरोपपत्रात अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा आणि फसवणुकीच्या पद्धतींचा सविस्तर खुलासा केला आहे. भक्तांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी खरात रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करायचा. महिला भक्तांना संशयित गुंगीचे औषध दिले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक खुलासाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. भक्तांना चमत्कारिक उपचारांचे आमिष दाखवून साध्या चिंचेच्या बिया प्रत्येकी 2 लाख रुपयांना, तर खडे आणि मधाच्या बाटल्या चक्क 9 लाख रुपयांना विकल्या जात होत्या. श्रीमंतांना मृत्यूची भीती खरातचे मुख्य टार्गेट श्रीमंत व्यावसायिक असायचे. “घरातल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल किंवा तुमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडेल” अशी भीती दाखवून, ‘अवतार पूजा’ व विशेष धार्मिक विधींच्या नावाखाली तो त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या उकळायचा. 142 बेनामी खाती आणि मनी लॉन्ड्रिंगचा कट लोकांची फसवणूक करून मिळवलेली काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरात आणि त्याच्या साथीदारांनी विविध सहकारी पतसंस्थांमध्ये तब्बल 142 बेनामी बँक खाती उघडली होती. समता नागरी सहकारी पतसंस्था (राहाता): 108 बेनामी खाती जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था (सिन्नर): 34 बेनामी खाती या खात्यांमधून पैशांची मोठी उलाढाल करून ही रक्कम नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवण्यात आली. ईडीची मोठी कारवाई: कोट्यवधींची मालमत्ता जप्त ईडीने खरातच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबाड हाती लागले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे: ईडीने आरोपपत्रासोबत आर्थिक व्यवहारांची सर्व कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि मालमत्ता जप्तीशी संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. या 3000 पानांच्या आरोपपत्रातील पुराव्यांमुळे आता या भोंदू बाबाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, विशेष न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन समोर आले. नियोजित बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गावरच खरातने सुमारे अडीच काेटींची जमीन खरेदी करून ठेवल्याचे भूसंपादनाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. खरातने साेलापूर जिल्ह्यातील कळमण गावात ज्या ठिकाणी जमीन खरेदी केली. त्याच ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे. मार्च २०२४ मधील व्यवहारानुसार कळमणच्या गट क्रमांक २००/१ मधील ४.४८ हेक्टर (सुमारे ११ एकरांपेक्षा जास्त) जमीन खरातच्या नावावर घेतले. खरेदीखतावरील किंमत २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये आहे. अशोक खरातची तब्बल २ हजार कोटींची मालमत्ता आणि त्यात राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांची छुपी गुंतवणूक पाहता आता चौकशीसाठी थेट ‘ईडी’ ची एन्ट्री झाली. ईडीच्या तपासामुळे खरातला माहिती पुरवणारे वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या काळ्या धंद्यात ‘स्लिपिंग पार्टनर’ असलेले अनेक पांढरपेशे रडारवर आले. भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश? अशोक खरातला आपल्या कृत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागताच त्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पीडित महिलांनी न्यायासाठी सुरुवातीला एका आमदाराची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितली होती, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. संबंधित आमदाराने पीडितांना मदत करण्याऐवजी उलट खरातलाच या तक्रारीची पूर्वसूचना दिली, ज्याचा फायदा घेत खरातने हे प्रकरण दाबण्यासाठी उलट पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अन्यायापुढे हार न मानता पीडितांनी दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली, ज्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार जाताच प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि या संपूर्ण अत्याचारकांडाला वाचा फुटली. लोकप्रतिनिधींची खंबीर साथ आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच या भोंदूबाबाचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले असून पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. हेही वाचा… सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ:42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल