Headlines

सीईओ गांधींचे 23 ग्रामपंचायतींना मार्गदर्शन:विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश




जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तालुक्यातील विकासकामे विहित मुदतीत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्रामविकासात लोकसहभाग, स्वच्छता, गुणवत्तापूर्ण सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. संत गाडगेबाबा उन्नत ग्राम अभियान अंतर्गत चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीईओ गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस आणि चांदूर बाजारचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश वानखडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी सहभागी झाले होते. उपस्थित दोन्ही अधिकाऱ्यांनी लोकसहभाग, शाश्वत ग्रामविकास आणि ग्रामपंचायतींची जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. हे अभियान एक लोकचळवळ बनले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डेप्युटी सीईओ बालासाहेब बायस यांनीही मार्गदर्शन केले, तर गटविकास अधिकारी डॉ. निलेश वानखडे यांनी अभियानाची सविस्तर माहिती, मूल्यांकन प्रक्रिया आणि ग्रामपंचायतींनी करावयाच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या निमित्ताने सीईओ गांधी यांनी चांदूर बाजार तालुक्याचा दौरा केला. त्यांनी विविध विकासकामे, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा आणि ग्रामीण विकासाशी संबंधित उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. घाटलाडकी येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन गावात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नियोजनाची माहिती जाणून घेत शासनाच्या निधीतून सुरू असलेली सर्व कामे निर्धारित कालावधीत आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर सीईओ गांधी यांनी शिरजगाव कसबा येथे भेट देऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच, गावातील राठी विद्यालयात जाऊन शैक्षणिक परिसराचीही पाहणी केली. पुढे, उमेद अभियानांतर्गत ‘नमो ड्रोन दीदी’ प्रकल्पाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ड्रोनच्या माध्यमातून शेतीमध्ये औषध फवारणी, खत व्यवस्थापन, पीक निरीक्षण आणि अचूक शेती कशा पद्धतीने करता येते, याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली. महिलांच्या सक्षमीकरणाला पूरक असलेल्या या अभिनव प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय येऊतकर यांनी केले, तर प्रास्ताविक रामेश्वर रामागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार समीर लेंडे यांनी मानले. घाटलाडकी येथील आदर्श शाळेच्या नव्या इमारतीची उर्वरित सर्व कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करून इमारत हस्तांतरित करण्याच्या स्पष्ट सूचना सीईओ गांधी यांनी दिल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त नव्या इमारतीत शिक्षण घेता यावे, यासाठी कामात कोणत्याही परिस्थितीत विलंब होऊ नये, असेही त्यांनी बजावले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *