![]()
राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत, खोटे फोटो तयार करणाऱ्या बालाजी म्हस्के या मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र, राज्याच्या सायबर सेलने तांत्रिक तपासणीअंती हे फोटो बनावट असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी बालाजी म्हस्के याचा शोध घेतला. पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून या गुन्ह्यात वापरलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. बदनामीकारक मजकूर पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या या संशयित आरोपीचे फेसबुकवर सुमारे 6 हजार फॉलोअर्स होते. मात्र सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने तातडीने कारवाई करत त्याचे हे फेसबुक खाते आता कायमचे बंद केले आहे. या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलिसांचे तांत्रिक पथक आणि विविध अधिकाऱ्यांनी उत्तम समन्वय राखत आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 356 (3), 66 (C), 67 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आता पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची पुढील प्रक्रियाही अत्यंत वेगाने सुरू आहे.
Source link
गिरीश महाजन यांचे बनावट 'AI' फोटो व्हायरल करणारा गजाआड:सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद