![]()
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर (कान्होली) शेत शिवारात विजेचा धक्का लागून एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, १९ जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. जीवन नारायण डवंगे (वय ३० वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. जीवन डवंगे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेला होता. या परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्याने शेताचे रक्षण करणे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. याच प्रयत्नात असताना जीवनला विजेचा धक्का बसला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. मृत जीवन डवंगे अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे डवंगे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण सोनोने, जमादार विजय निमकांडे, गोपाल सोळंके आणि मुज्जफर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. खल्लार पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Source link
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू:दर्यापूर तालुक्यातील हुसेनपूर शेत शिवारात घडली घटना