![]()
देशभरात नीट परीक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या निकालामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ला नोटीस बजावत संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका प्रकार काय? गुणांमधील मोठी तफावत नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर NTA ने पुन्हा परीक्षा घेतली आणि १६ जुलै रोजी या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र, या निकालाने बीडमधील गवते कुटुंबाला मोठा धक्का दिला. पहिला विद्यार्थी (सोहम गवते): अधिकृत आन्सर की आणि स्वतःची ‘ओएमआर शीट’ तपासल्यानंतर सोहमला किमान ५२२ गुण मिळण्याची खात्री होती. मात्र, प्रत्यक्ष स्कोअरकार्डवर त्याला केवळ ९५ गुण देण्यात आले. दुसरी विद्यार्थिनी: याच भागातील एका विद्यार्थिनीला तब्बल ७०२ पेक्षा अधिक गुण मिळण्याची अपेक्षा असताना, निकालात तिला अवघे ८७ गुण मिळाल्याचे समोर आले आहे. हायकोर्टाचा NTA ला दणका आपल्या गुणांमध्ये प्रचंड मोठी गडबड झाल्याचे लक्षात येताच शुभम गवते या विद्यार्थ्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांचे वकील महेंद्र पंडितराव गंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून NTA ला नोटीस बजावली आहे. तसेच, येत्या एका आठवड्याच्या आत या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच पुढील सुनावणी होणार आहे. कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर नीट परीक्षेत चांगले यश मिळेल या आशेवर असलेल्या गवते कुटुंबाला निकालाने मोठा मानसिक धक्का दिला. हा निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थी कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुलाच्या कष्टांबद्दल सांगताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाने रात्रंदिवस एक करून अभ्यास केला. तो सलग दोन-तीन तासांपेक्षा जास्त कधी झोपला नाही, वेळेवर जेवण केले नाही. आजारी असतानाही त्याने पुस्तके खाली ठेवली नाहीत. पण या निकालाने त्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरले.” तर, ‘आन्सर की’ आणि निकालामध्ये प्रचंड तफावत असल्याने आपण न्यायासाठी थेट हायकोर्टात लढा देणार असल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली होती. ज्याला आता कोर्टाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हेही वाचा.. नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार:26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.
Source link
रात्रंदिवस अभ्यास, पण निकालाने धक्का:बीडच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर हायकोर्टाची NTA ला नोटीस, आठवडाभरात उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश