Headlines

राम नदीच्या ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास आवश्यक – प्रा. देशपांडे:कोहिनूर राम नदी महोत्सवात पीव्हीपीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व्याख्यान




राम नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून एक नैसर्गिक परिसंस्था आहे, ज्यात सजीव आणि निर्जीव घटक परस्परांवर अवलंबून असतात. पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या राम नदीच्या अस्तित्वाचा, ऐतिहासिक तथ्यांचा तसेच पर्यावरणीय, जीवशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक आर्किटेक्ट देवेंद्र देशपांडे यांनी केले. कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (१७ डिसेंबर) पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी राम नदीवर केलेल्या अभ्यासावर दृक्‌‍-श्राव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रा. देशपांडे बोलत होते. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. या महोत्सवाचा समारोप १९ डिसेंबर रोजी होणार असून, त्यावेळी नागरी समस्या निवारण समिती, भूगाव यांना कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते ‘राम नदी सेवक सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रा. आर्किटेक्ट देवेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, राम नदी ही एक ऋतुस्रावी नदी असून ती खाटपेवाडीपासून भूकुम, भूगाव, बावधन, पाषाण, बाणेरमार्गे मुळा नदीला मिळते. या नदीला ऐतिहासिक महत्त्व असून तिच्या तिरावर मानवी वस्ती आणि नैसर्गिक अधिवास आढळल्याच्या नोंदी आहेत. विद्यार्थ्यांनी नदीचा जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक घटकांच्या माध्यमातून अभ्यास केला. यात नदीतील झरे, नैसर्गिक स्रोत, जैवविविधता आणि भूजल भांडार यांचा समावेश होता. या अभ्यासात विद्यार्थ्यांनी नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचाही सखोल अभ्यास केला. भारतीय समाजमनानुसार नदी हे सामाजिक घडामोडींचे आणि मानवी बदलांचे केंद्रस्थान असते. त्यामुळे नदीच्या तिरावरील बांधकामे, त्यांच्या पद्धती आणि रस्त्यांचा विस्तार याविषयीची माहितीही संकलित करण्यात आली. शहरीकरणामुळे राम नदी अत्यंत दुर्लक्षित राहिली असून, त्यामुळे निसर्गचक्राची मोठी हानी झाली आहे. नदी परिसरात अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी शासन व्यवस्थेने जागृत राहणे आवश्यक आहे, असे प्रा. देशपांडे म्हणाले. विद्यार्थ्यांनी राम नदीच्या दुरवस्थेला कारणीभूत अनेक घटकांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. प्रदर्शने आणि पथनाट्याच्या माध्यमातून ते समाजजागृतीचा प्रयत्न करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *