Headlines

वर्ध्यात शाळांच्या सुट्टीचा 'खेळ':विद्यार्थ्यांचे आरोग्य की राष्ट्रपतींच्या दौऱ्याची सोय? प्रशासनाने दिलेला तो सुट्टीचा आदेश गुलदस्त्यात!




वर्धा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असले, तरी मंगळवार व बुधवारपासून तापमानात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १,४५४ शाळा व १,६२७ अंगणवाडी एकूण ३,०८१ शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शुक्रवारी तापमान चक्क ४४.४ अंश सेल्सिअस वर पोहचले असताना, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी ४४ तापमानात सुट्टी देण्याच्या निर्णयामागे नेमका उद्देश काय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, शहरालगतच्या एका शाळेच्या ग्रुपमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे एक दिवसाची सुट्टी असा मजकूर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर हा संदेश झपाट्याने पसरल्यानंतर शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, सुट्टी ही केवळ वाढत्या तापमानामुळे देण्यात आली आहे. तरीही नागरिकांच्या मनातील शंका मात्र कायम आहेत. ४४ तापमान असताना सुट्टी, पण ४४.४ असताना सुट्टी नाही वर्धा जिल्ह्यात इंग्रजी माध्यमासह प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये केजी-१ ते दहावीपर्यंतचे वर्ग नियमित भरविले जातात. सकाळीच १० वाजताच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवत असताना लहान मुलांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाने वेळेवर गांभीर्याने पाहिले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. १७ एप्रिल रोजी तापमान ४४.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना त्या दिवशी मात्र सुट्टी जाहीर करण्यात आली नाही, हेही विशेष ठरत आहे. मुलांच्या आरोग्यापेक्षा राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या सोयीसाठी होता का? याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांचा ताफा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतून जाणार असल्याने कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीच शाळांना सुट्टी देण्यात आली का? अशी चर्चा रंगत आहे. प्रशासनाचा निर्णय मुलांच्या आरोग्यापेक्षा ताफ्याच्या सोयीसाठी होता का? हा मुद्दा आता केंद्रस्थानी आला आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्रीही या दौऱ्यावर उपस्थित असल्याने, सुट्टीच्या आदेशामागे त्यांचे काही निर्देश होते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. वाढत्या उष्णतेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन जागे होईल की निद्रा अवस्थेत राहील याकडे लक्ष वेधले जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *