Headlines

रोहित पवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस:कर्जमाफीच्या अटींवर तोडगा निघणार? कृषिमंत्र्यांची घोषणा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित




पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही.. “माझे वडील, पत्नी आणि मुलं भावुक झाली आहेत. मुलं ‘बाबा लवकर घरी या’ असा निरोप देत आहेत, पण अन्नदात्याच्या न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही, असे रोहित पवार म्हणाले. मनोज जरांगे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि इतर पक्षांचे नेते आंदोलनस्थळी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अटी का? असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक होणार- कृषिमंत्री पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मागण्यांची राज्य सरकारने दखल घेतल्याचे संकेत कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिले आहेत. रोहित पवार यांच्याशी दोन वेळा फोनवरुन चर्चा झाल्याचे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. रोहित पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भातील मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावण्यात आली असून त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, सर्वांचे समाधान होणार नसले तरी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. राजकारण बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी करा- बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या ‘अन्नत्याग आंदोलनाला’ आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. “सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये,” असे आवाहन करत थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात सरकारने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. सध्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अत्यंत तुटपुंजी असून ती जाचक अटींनी वेढलेली आहे, त्यामुळे सरकारने तात्काळ राजकारण बाजूला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. रोहित पवारांनी आक्षेप घेतलेल्या ‘त्या’ दोन जाचक अटी कोणत्या? 1) २०१९ च्या लाभाची अट: सरकारने काढलेल्या जीआरनुसार, ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता, त्यांना आताच्या कर्जमाफीत केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. 2) प्रोत्साहन अनुदानाची अट: नियमित कर्ज भरणार्‍या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देताना सरकारने २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांचे पीक कर्ज पूर्ण भरणे अनिवार्य केले आहे. ३७ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार- रोहित पवार
या अटींमागील गणित मांडताना रोहित पवार म्हणाले, “वरवर पाहता सरकारने ३५ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करून मोठी वाहवा मिळवली असली, तरी प्रत्यक्षात या दोन जाचक अटींमुळे राज्यातील सुमारे ३७ लाखांहून अधिक शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे.” साधी सरळ मागणी, अटी काढा आणि आंदोलन संपवा
आपली भूमिका स्पष्ट करताना रोहित पवार पुढे म्हणाले, “आमची सरकारकडे कोणतीही क्लिष्ट मागणी नाही. ही अत्यंत साधी आणि सरळ मागणी आहे की, शेतकऱ्यांच्या गळ्याला नख लावणाऱ्या या दोन अटी सरकारने आधी जीआरमधून काढून टाकाव्यात. सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ, अन्यथा आमचे अन्नत्याग आंदोलन अधिक तीव्र होईल.” सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अजूनही धुंदीत – राजेंद्र पवार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आंदोलनस्थळी उपस्थित राहून भावूक झाले. “मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, त्यामुळे आता शेतकरी हाच त्याचा खरा बाप आहे,” असे म्हणत त्यांनी मुलाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. रोहित पवार हे स्वतःच्या नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढत असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता घरात बसायचे की आंदोलनात सहभागी व्हायचे, हे ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अजूनही धुंदीत असल्याची टीका करत त्यांनी कर्जमाफीतील जाचक अटी हटवण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली. मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखे – हाके पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू असतानाच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पवार कुटुंबातील व्यक्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणे म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखे आहे,” असा टोला लगावत त्यांनी आंदोलनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचीही मागणी केली. महाराष्ट्रातील शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा आरोप करत हाके यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. पवारांचा वारस उपोषणाला बसणे हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली. रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक- गोपीचंद पडळकर रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते आंदोलनाच्या माध्यमातून नाटक करत आहेत. हे आंदोलन आहे की एखाद्या चित्रपटाचे शूटिंग, असा प्रश्न पडतो.” त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला “नटरंग चित्रपटाच्या शूटिंगसारखी ही एक्टिंग सुरू आहे,” असा टोला लगावला. प्रशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली रोहित पवारांची भेट पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनस्थळी प्रशासनाच्या शिष्टमंडळाने भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही घडवून आणण्यात आला. मंत्र्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याबाबत सरकारकडून सार्वजनिक आणि ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली. शेतकऱ्यांमध्ये या अटींविरोधात तीव्र संताप असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही विविध भागांतून शेतकरी संघटना आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असून सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नसल्याने रोहित पवार यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “अन्नदात्याच्या न्यायासाठी सुरू केलेला हा लढा असून, विनाअट सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत माघार नाही,” अशी भूमिका रोहित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा वाद- कोण पात्र, कोण अपात्र?:नेमके काय आहेत निकष? टीका का होत आहे? 5 प्रश्नांमधून समजून घ्या योजनेविषयी सर्वकाही राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारने घातलेल्या विविध अटी आणि शर्तींमुळे अनेक शेतकरी यातून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनीही या योजनेवर फसवी म्हणत आक्षेप घेतल आहेत. या विषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात विविध शंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर या योजनेविषयी या ५ प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊया… सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *