Headlines

पुण्यात संगमवाडीत भरधाव कार झाडावर आदळली:चालकासह दोघे जखमी, मद्यधुंद अवस्थेचा संशय




संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ जवळ गुरुवारी पहाटे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चालकासह दोघेजण जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की झाड खोडासकट उन्मळून फूटपाथवर कोसळले, तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तत्काळ मदतीला धाव घेत कारमधील एका व्यक्तीला बाहेर काढले. मात्र चालकाचा पाय स्टेअरिंग आणि दरवाज्यामध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. येरवडा आणि कसबा अग्निशमन केंद्राच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने मॅन्युअल स्प्रेडर व दोरीच्या साह्याने बचावकार्य राबवून चालकाचा पाय सुखरूप बाहेर काढला. त्यानंतर जखमी चालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील दोन्ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक संशय आहे. कारचा क्रमांक एमएच-12 वायएच-5569 असून ती पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीची कार आहे. अपघातात वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ३० जुलै रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. कार चालकाची ओळख श्रीराज राकेश शिंदे (वय २०, रा. घोले रोड, पुणे) अशी झाली आहे. झाडाला धडक बसल्याने हा अपघात झाला असून चालक जखमी झाला आहे. त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *