![]()
“आज आपला भारत देश अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संरक्षण क्षेत्रात जगाला थक्क करणारी प्रगती करत आहे. समोरच्या युद्धात भारताला हरवणे शक्य नसल्याचे शत्रूंना कळून चुकले आहे. त्यामुळे भारताची खरी ताकद असलेल्या युवा पिढीला अमली पदार्थांच्या ज
.
मुंबईत आयोजित ‘नशामुक्त मुंबई’ (Drug Free Mumbai) अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी 10 हजारहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना ‘नशामुक्त मुंबई आणि भारत’ घडवण्याची सामूहिक शपथ दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…
‘ड्रग्ज हे भारतावरील छुप्या युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र’
भारताच्या वाढत्या जागतिक ताकदीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज माफियांच्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. भारत हा जगात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश आहे. ही युवाशक्ती योग्य दिशेने गेली, तर भारत जगाचा ‘महागुरू’ आणि ‘महाशक्ती’ बनेल. शत्रूंना हे स्पष्टपणे माहीत आहे की भारताला समोरासमोरच्या युद्धात पराजित करता येत नाही. म्हणून त्यांनी तरुण पिढीला व्यसनाधीन करून देशाला भविष्यात नेस्तनाबूत करण्याचे ‘छुपे युद्ध’ सुरू केले असून, ‘ड्रग्ज’ हे या युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. दुर्दैवाने केवळ पैशांच्या हव्यासापोटी आपल्याच देशातील काही प्रवृत्ती या देशविघातक षड्यंत्रात सामील झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.
पोलिसांची कारवाई आणि तरुणांचा निश्चय आवश्यक
ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केवळ एक विभाग पुरेसा नसून संपूर्ण ‘इकोसिस्टीम’ नष्ट करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. पोलीस, समाजकल्याण, आरोग्य, शालेय शिक्षण विभाग यांच्यासह शिक्षक आणि पालकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सिंथेटिक ड्रग्जचे उत्पादन होणाऱ्या जागा, त्यांचे पुरवठादार आणि शाळा-कॉलेजांच्या परिसरात ड्रग्ज विकणाऱ्यांचे नेटवर्क आणि त्यांचे ‘आका’ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
तरुणांचा ‘नो टू ड्रग्ज’ संकल्प
जर तरुणाईनेच ड्रग्जला ठामपणे No to Drugs म्हणण्याचा संकल्प केला, तर कोणाचीही हिंमत ड्रग्ज विकण्याची होणार नाही. पुढील दोन ते चार वर्षांत आपण ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ नक्कीच घडवू. स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी तरुणांना त्यांच्यातील ऊर्जेची जाणीव करून दिली: ‘युवा’ हा शब्द उलटा केल्यास ‘वायू’ बनतो. वायू जेव्हा वादळाचे रूप घेतो, तेव्हा तो प्रचंड विनाश करतो. पण तोच वायू जेव्हा ‘ऑक्सिजन’ बनतो, तेव्हा तो समाजाला जीवन देतो. आजच्या तरुणाईने समाजासाठी विनाशकारी वादळ न बनता, देशाला जिवंत ठेवणारा ‘ऑक्सिजन’ बनले पाहिजे.
माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राहणार, बक्षीस मिळणार
ड्रग्जच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी काव्या’चा उल्लेख केला. मी स्वतः सर्व शाळा व कॉलेजांच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना पत्र लिहित आहे. कॅम्पसच्या आसपास ड्रग्ज विकणाऱ्यांची किंवा व्यसनाकडे ढकलणाऱ्यांची माहिती त्वरित सरकारला द्यावी.
जे नागरिक, शिक्षक किंवा विद्यार्थी अशी माहिती देतील, त्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. भविष्यात माहिती देणाऱ्यांना शासनाकडून पुरस्कृतही केले जाईल, पण त्यांची ओळख कधीच उघड होणार नाही.
एका सर्वेक्षणाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, वयाच्या 21 ते 22 वर्षांपर्यंत जर तरुण ड्रग्जपासून दूर राहिला, तर तो आयुष्यात कधीही व्यसनाकडे वळत नाही. त्यामुळे हा काळ स्वतःला सांभाळण्याचा आहे.
शपथ हे स्वतःच्या मनाशी घातलेले बंधन
भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शपथेचे महत्त्व समजावून सांगितले. “माणूस जगाशी खोटं बोलू शकतो, पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षिने घेतलेली ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ची शपथ ही केवळ औपचारिकता नसून ते स्वतःशी घातलेले बंधन आहे,” असे सांगत त्यांनी तरुणांना नशामुक्त भारत घडवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी व्हिडिओ घेत त्यांचा उत्साह वाढवला.