Headlines

तपासाच्या नावाखाली पोलिसांचे पर्यटन:महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश




कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाच्या तपासासाठी साताऱ्याला गेलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तपासाऐवजी पर्यटनस्थळांना भेट दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या तिघांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षकाकडे सोपवण्यात आला होता. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार आणि एक महिला पोलीस शिपाई तक्रारदार महिलेसह साताऱ्याला गेले होते. साताऱ्याला पोहोचल्यानंतर त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती देणे आणि त्यांची मदत घेऊन तपास करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. एका ढाब्यावर जेवण केल्यानंतर दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते सातारा शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले. पंचनामा करताना घटनास्थळाच्या परिसरातील रहिवाशांकडे चौकशी किंवा तपास करण्यात आला नाही. तसेच, या घटनेची नोंद साताऱ्यातील संबंधित पोलीस ठाण्यात करणेही आवश्यक होते, जे केले गेले नाही. पुण्यात परत येण्याऐवजी, महिला पोलीस अधिकारी, हवालदार आणि शिपाई कास पठार व अन्य पर्यटनस्थळे पाहण्यासाठी गेले. त्यावेळी तक्रारदार महिला त्यांच्यासोबत होती. ‘माझी आई आजारी आहे, ती एकटी घरी आहे, मला लवकर घरी पोहोचणे गरजेचे आहे’, अशी विनंती तक्रारदार महिलेने पोलिसांकडे केली होती. कास पठार आणि इतर पर्यटनस्थळे पाहिल्यानंतर त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवण केले. त्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास ते पुण्यात पोहोचले. सुरुवातीला तक्रारदार महिलेला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न केला. महिलेने विनंती केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीत सोडून पोलीस निघून गेले. या प्रकारानंतर महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, “महिला पोलीस उपनिरीक्षकांसह तिघांनी साताऱ्यात जाऊन कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही, तर मोघम स्वरूपाचा तपास करत पर्यटनस्थळे पाहण्यात वेळ घालवला. त्यांनी कर्तव्यात बेजबाबदारपणा, बेशिस्त आणि निष्काळजीपणा दाखवला, ज्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *