![]()
अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक नऊ वडाळी परिसरातील भोईपुरा, अण्णाभाऊ साठे नगर, गुरुकृपा नगर आणि मीनाताई ठाकरे शाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा अनियमित पुरवठा होत आहे. व्होल्टेजमध्ये सततच्या चढ-उतारामुळे येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांना निवेदन दिले. या निवेदनात परिसरात तातडीने नवीन डीबी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महापौर श्रीचंद तेजवानी यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे. व्होल्टेजमधील बिघाडामुळे परिसरातील नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, ए.सी. आणि पंखे यांसारखी अनेक महागडी विद्युत उपकरणे निकामी झाली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, भविष्यात शॉर्ट सर्किट होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. त्यांच्या मते, वडाळी परिसरात त्वरित नवीन डीबी बसवून सर्व विद्युत खांबांवर तीन फेज वीजवाहिनी जोडण्यात यावी. महावितरणने तातडीने जागेची पाहणी करून आवश्यक ती सर्व तांत्रिक कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना नगरसेविका पंचफुला चव्हाण, भाजपा विद्यापीठ मंडळ अध्यक्ष प्रफुल्ल बोके, संजय चव्हाण, विजय माने, प्रिया शेंडे, श्वेता चाचरकर, सोनू चाचरकर, गिरिजा चाचरकर, भावना किल्लेवाले, ममता किल्लेवाले, निर्मल बागडे, पूर्वा किल्लेवाले, माया मोहनकर, संगीता मोहनकर, जया रंधळे, कौशल्या ठाकरे, अनिता अवसरे, मयुरी खेवले, रंजना उके, लक्ष्मी सरवरे, कल्पना शेंडे, मंगल टोपरे, विद्या राऊत, अंजली टोपरे, दीपक राऊत, अमोल मोहनकार यांच्यासह वडाळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
वडाळीत व्होल्टेजच्या चढ-उतारामुळे नागरिक त्रस्त:महावितरणकडे नवीन डीबीची मागणी; महापौरांनीही केली शिफारस