![]()
वैशाखाच्या तळपत्या उन्हात माणूस नकळत सावलीचा आसरा शोधत असतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून काही क्षण दिलासा मिळावा म्हणून भिंतीच्या कडेला विसावलेल्या तिघी महिलांना मात्र हा आसरा जीवघेणा ठरला. काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेला दुपारचा निवांत क्षण आक्रोशात बदलला. अचानक आलेल्या वावटळीने घरावरील पत्रे उडाले तसेच कुंभाटी आणि दगड वीटा पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर दोने महिला जखमी झाली. वैराग येथील संजय नगर परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत हमिदा रफिक बेग (वय ४५) यांचा मृत्यू झाला तर शमशाद बाबू शेख (वय ४९) आणि सजनबी महबूब बेग (वय ७५) अशी जखमी महिलांची नावे आहेत. भर उन्हाच्या झळा असह्य झाल्याने परिसरातील काही महिला शेजारील भिंतीच्या सावलीत बसल्या होत्या. त्याचवेळी अहमद तय्यब शेख यांच्या घराच्या दिशेने अचानक जोरदार वावटळ आली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घरावरील पत्रे उचकटून काही घरात कोसळली तर काही दूरवर उडून गेली.क्षणात कुंभाटीच्या विटा कोसळून सावलीत बसलेल्या महिलांवर आदळल्या. या दुर्घटनेत हमिदा बेग गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीनेबार्शीकडे रुग्णवाहिकेतून नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जखमींवर उपचार सुरू आहेत. बेग यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि सासू असा परिवार आहे. अचानक सुटलेल्या वावटळीमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “क्षणभरापूर्वी गप्पा मारत बसलेल्या महिलांवर अचानक विटांचा वर्षाव झाला आणि सगळेच हादरून गेले,” असे प्रत्यक्षदर्शींने सांगितले.
Source link