Headlines

विचार बदला, तरच वर्तन बदलेल- आदर्शऋषीजी महाराज:700 चिमुकल्यांनी गिरवले संस्कारांचे धडे, धर्म आणि विज्ञानाची अनोखी सांगड‎




मुलांनी केवळ ज्ञानी होण्यापेक्षा, प्राप्त केलेले ज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार बदलतात, तेव्हा तुमचे वर्तन आपोआप सकारात्मक होते, असे प्रतिपादन पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांनी केले. श्री तिलोक रत्न धार्मिक परीक्षा बोर्डाच्या वतीने आयोजित ‘आनंद बालसंस्कार शिबिरा’च्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. १ ते ६ मे दरम्यान रंगलेल्या या शिबिरात नगरसह बाहेरील गावांतील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. दोन महिन्यांच्या पूर्वतयारीनंतर साकारलेल्या या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खास आखणी करण्यात आली होती. यामध्ये साध्वी वृंद, आनंद संस्कार शिक्षा अभियानाच्या शिक्षिका आणि ब्राह्मी युवती मंच यांचा मोलाचा वाटा होता. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने आनंदधामचा परिसर गजबजून जात असे. या शिबिरात तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मुलांकडून फिटनेस आणि ध्यानधारणा (मेडिटेशन) करून घेतली. दैनंदिन जीवनातील उदाहरणांतून मंत्र, आचरण, जैन इतिहास आणि मैत्री यांसारखी जीवनावश्यक सूत्रे सोप्या भाषेत शिकवण्यात आली. शेवटच्या तासात स्क्रीनवर आदर्श व्यक्तिमत्त्वांची माहिती आणि ‘माइंड डेव्हलपमेंट’चे नवनवीन प्रयोग दाखवण्यात आले. शिबिराच्या प्रभावामुळे अनेक मुलांनी “अन्न वाया घालवणार नाही’, “रात्री भोजन टाळणार’ आणि “जंक फूड कमी करू’ असे संकल्प सोडले. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेले ताली नृत्य आणि भगवान महावीरांच्या शिकवणीवर आधारित पथनाट्य उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. या शिबिरात सहभागी सर्व बालमंडळींना प्रोत्साहन म्हणून ड्रायफ्रूट्स आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *