![]()
शहर वेगाने बदलत आहे. मात्र, मूळ शहरातील जुन्या पाऊलखुणा तशाच दिसत आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. नवीन नगर विकसित होत असताना जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांच्या गरजा वाढत आहेत व बदलती आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगत महापालिकेने शहराभोवती पब्लिक पार्कची उभारणी करावी. त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल व नागरिकांना सुविधा मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पालकमंत्री विखे यांच्या हस्ते नेहरू मार्केट व्यापारी संकुल व भाजी मंडईच्या चार मजली इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, सभापती सुभाष लोंढे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे म्हणाले, शहराचे अर्थकारण शेतकरी केंद्रित आहे. त्यामुळे नेहरू मार्केट सारखे आणखी प्रकल्प उभारावेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध होईल. आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. अद्ययावत हॉस्पिटलची इमारत उभी राहिली आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. नेहरू मार्केटच्या इमारतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तोही आता मार्गी लागला आहे. नवीन व्यापारी संकुलात ५७ गाळे, ५३ ओटे नेहरू मार्केटच्या नव्या संकुलात भाजी विक्रेत्यासाठी ५३ ओटे असणार आहेत. तसेच, एकूण ५७ गाळे या संकुलात असणार आहेत. त्यातील दहा गाळ्यांमध्ये जुन्या गाळेधारकांचे पुनर्वसन होणार आहे. उर्वरित गाळ्यांचे लिलाव होणार आहेत. महापालिकेने या संकुलासाठी ९.३४ कोटींची निविदा मंजूर केली आहे. येत्या दीड वर्षात या संकुलाची उभारणी केली जाणार आहे.
Source link
पब्लिक पार्कच्या उभारणीसाठी निधी देणार:पालकमंत्री विखे,नेहरू मार्केटच्या इमारतीचे भूमिपूजन