Headlines

विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर घणाघात:सरकारने स्वतःलाच 100 पैकी 100 गुण दिले, पण जनतेने नापास केले!




महायुती सरकारच्या कामकाजावर काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार स्वतःच्या कामगिरीचे मोठमोठे दावे करत असले, तरी प्रत्यक्षात जनतेचा अनुभव वेगळाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सरकारला लक्ष्य केले. वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःच्या पाठीवर थाप मारण्यात सरकार अव्वल ठरले असले तरी जनतेने त्यांना वास्तवाचा आरसा दाखवला आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि जाहिरातींमधून विकासाचे दावे करणाऱ्या सरकारचे वास्तव सर्वेक्षणातून समोर आले असल्याचा दावा त्यांनी केला. रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरले महायुती सरकार महाराष्ट्राला ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ बनवल्याचा दावा करत आहे. परंतु सर्वेक्षणात रोजगारनिर्मितीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. दावोस परिषदेत झालेल्या गुंतवणूक करारांच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या, मात्र त्याचा रोजगारनिर्मितीवर अपेक्षित परिणाम झालेला दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “जर रोजगारच निर्माण झाला नसेल, तर दावोसमधील करार आणि घोषणांचा नेमका फायदा काय झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाढत्या महागाईवरून सरकारवर निशाणा सामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचा घरखर्च वाढला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून लोक खिसा कापून जगत आहेत. मात्र सरकार अजूनही ‘अच्छे दिन’चे चित्र रंगवत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी सरकारच्या कामगिरीवर नाराज? शेतकरी हिताच्या योजनांबाबत सरकार सातत्याने दावे करत असले तरी प्रत्यक्षात मोठा वर्ग समाधानी नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी म्हटले की, सरकारच्या प्रयत्नांबाबत मोठ्या प्रमाणावर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. “संतुष्ट शेतकरी फक्त सरकारी जाहिराती आणि होर्डिंगवर दिसतो, प्रत्यक्ष शेतकरी मात्र अडचणीत आहे,” असा टोला त्यांनी लगावला. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्न सरकारी रुग्णालयांची स्थिती अद्याप समाधानकारक नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी आरोग्य क्षेत्रावरही सरकारला घेरले. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी नागरिकांना मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित बदल जाणवत नाहीत. ‘जनतेचा निकाल सरकारविरोधात’ सरकारच्या कामगिरीचा एकूण आढावा घेताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक शब्दांत म्हटले की, सरकारने स्वतःलाच 100 टक्के गुण दिले आहेत. मात्र जनतेच्या परीक्षेत हे सरकार नापास ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. महायुती सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *