Headlines

विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 3 दिवस पाऊस:मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्याचा 15 राज्यांत परिणाम, मुंबईत दरड काेसळून 7 ठार




उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील ३ दिवस मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. याचा थेट परिणाम राज्यातील हवामानावर झाला असून बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे घाटकोपरला चाळीवर दरड कोसळून ७ जणांचा बळी मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरातील चिरागनगरच्या गौसिया चाळीवर अचानक दरड कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून ४ जण जखमी झाले आहेत. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेने मुंबईतील २५७ अति धोकादायक ठिकाणांवर आणि मृत्यूच्या छायेत राहणाऱ्या २२,४८३ कुटुंबांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला आणि माती तसेच दगडांचे मोठे ढिगारे खाली असलेल्या दोन-तीन घरांवर येऊन कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अरुंद गल्ल्यांमुळे अडथळे : महापौर महापौर रितू तावडे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. परिसरातील अरुंद गल्ल्यांमुळे यंत्रसामग्री नेणे शक्य नसल्याने दगड आणि माती हाताने हटवावी लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, १९९२ ते २०२६ या काळात दरडी कोसळून तब्बल ३४० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. १५ वर्षांपूर्वीचा ‘प्लॅन’ कागदावरच मुंबई स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्डाने २०१० मध्ये सर्व्हे करून ९,६५७ झोपड्यांचे तातडीने पुनर्वसन आणि उर्वरित भागात संरक्षक भिंत उभारण्याची शिफारस केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ सप्टेंबर २०११ रोजी नगरविकास विभागाला ‘ॲक्शन टेकिंग प्लॅन’ तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, १५ वर्षे उलटूनही यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे ७ निष्पापांचा गेला बळी ही घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून पूर्णपणे प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही नगरविकास विभागात ही फाइल धूळ खात पडली. दरवर्षी पावसाळा जवळ आला की आपत्ती व्यवस्थापनाच्या उच्चस्तरीय बैठकांचा फार्स केला जातो. मात्र, डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याऐवजी फक्त नोटिसा बजावते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *