![]()
व्यवसाय विस्तारासाठी १५ दिवसांत ७ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून हर्सूल येथील प्रिंटिंग प्रेस उद्योजक प्रकाश रोहिणीकर यांना १ कोटी ९ लाख ८५ हजार १०० रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी ११ ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात ८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात स्थानिक मध्यस्थ असलेल्या धर्मेंद्र झा (४२) यास अटक करण्यात आली असून मोहिनी झा (३५, रा. जयभवानीनगर), गणेश देशमुख (४२), अमृता देशमुख ऊर्फ चिंचोळे (३८, रा. जवाहर कॉलनी) तर दिल्लीतील सूत्रधार हरजितसिंग रुपराह (४८), आरव अग्रवाल (४०), अशोक सिंघल (३५), दीपक आरोरा (३०, चौघे रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गेल्या महिनाभरात कर्जाच्या नावाखाली फसवणुकीचा हा चौथा प्रकार आहे. ८४ चेक अन् कोऱ्या कागदांवर सह्या जुलै २०२५ मध्ये गणेश देशमुख याने रोहिणीकर यांची ओळख धर्मेंद्र झा याच्याशी करून दिली. झा याने दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून विनाकागदपत्रे १५ दिवसांत कर्ज मिळवून देण्याची हमी दिली. हरजितसिंगच्या सांगण्यावरून रोहिणीकर दिल्लीला गेले. तेथे ८४ रिपेमेंट चेक व दोन स्वाक्षरी केलेले चेक दिले. १३ नोव्हेंबर २०२५ व ३० मार्च २०२६ रोजी पुन्हा दिल्लीला बोलावून इंग्रजी फॉर्म तसेच कोऱ्या कागदांच्या प्रत्येक पानावर सही व अंगठा घेण्यात आला. मात्र कर्जाची रक्कम कधीच जमा झाली नाही. या चार नावाने मागितले पैसे १ लॉगिन व प्रोसेसिंग फी: कर्ज अर्जाच्या सुरुवातीला हजारो रुपये उकळले.
२ जीएसटी व इन्शुरन्स: कर्ज मंजुरीचा बनावट ड्राफ्ट दाखवून रक्कम उकळली.
३ सीए व प्रोजेक्ट रिपोर्ट फी: कागदपत्रांच्या नावाखाली खात्यावर व रोख पैसे घेतले.
४ मेडिकल मॅनेजमेंट फी: बनावट सर्टिफिकेटची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपये घेतले. ■ बँक सोडून कोणतीही प्रायव्हेट संस्था १५ दिवसांत विनाकागदपत्र कोट्यवधींचे कर्ज देण्याचा दावा करत असेल, तर तो १००% फ्रॉड आहे. ■ कशाही आधी लॉगिन फी किंवा इन्शुरन्सच्या नावाखाली रोख/खाजगी खात्यावर पैसे मागणे. ■ शासकीय किंवा वैद्यकीय प्रमाणपत्रे ‘मॅनेज’ करण्याची भाषा करणे. ■ शासकीय किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकृत शाखेला भेट न देता फक्त हॉटेल किंवा खाजगी ऑफिसमध्ये बैठका घेणे.
Source link
7 कोटींच्या कर्जाच्या आमिषाने उद्योजकांची 1 कोटीची फसवणूक:शहरात 30 दिवसांत चौथी घटना, शहर लोन माफियांच्या रडारवर