Headlines

विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन वसुधा' अभियान:अकोल्याला हरित बनवण्याचा संकल्प




विक्रमी ४७ अंश सेल्सिअस तापमानामुळे अकोल्याची ओळख देशातील अतिउष्ण शहरांमध्ये झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. दरवर्षी लाखो झाडे लावली जातात; मात्र त्यातील मोठा हिस्सा काही महिन्यांतच नष्ट होतो. त्यामुळे केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्ष जगवणे हीच काळाची खरी गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर जेसीआय अकोला सिटीच्या पुढाकारातून, पीएसव्ही नर्सरी व असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स ऑफ अकोला (अरोमा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयांसाठी ‘ग्रीन वसुधा अभियान’ राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना निर्माण करून “एक विद्यार्थी- एक वृक्ष- एक जबाबदारी’ हा संकल्प रुजवणे व अकोल्याला पुन्हा हरित बनवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती जेसीआय अकोला सिटीचे अध्यक्ष अमोल अग्रवाल, सचिव अभय राठी, प्रकल्प संचालक डॉ. प्रिया वखारिया व लक्ष्मीकांत डागा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. “यंदा आम्ही किती झाडे लावली हे मोजणार नाही, तर किती झाडे जगवली हे मोजणार आहोत. हाच ‘ग्रीन वसुधा’ अभियानाचा खरा उद्देश आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानाच्या यशस्वितेसाठी डॉ. दीपक वखारिया, डॉ. संकेत वखारिया, संजय श्रावगी, नितीन भारूका, आनंद अग्रवाल, संदीप अग्रवाल, गौतम श्रावगी, रेवती ढोरे, ज्ञानेश्वरी बनकर, रजनी कलंत्री, पलक खंडेलवाल आदी परिश्रम घेत आहेत. तज्ज्ञ समितीकडून परीक्षण व पुरस्कार : लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाचे परीक्षण ऑक्सिजन मॅन षण्मुख नाथन, सहाय्यक वन अधिकारी नम्रता ताले, महाबीजचे सेवानिवृत्त अधिकारी श्यामलाल तिबुडे, पर्यावरण तज्ज्ञ उदय वझे आणि रानवारा संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी दिवेकर यांच्या तज्ज्ञ समितीकडून केले जाईल. येत्या २६ जानेवारी २०२७ रोजी जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट वृक्षसंवर्धन करणाऱ्या विद्यार्थी, शाळा व महाविद्यालयांचा ‘सिटी चॅम्पियन पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना यासंदर्भात सूचना दिल्या असून विद्यार्थी, पालक व शाळांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *