![]()
विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीची चौकशी केवळ कागदावरच राहिली आहे. काँग्रेसने स्थापन केलेल्या चौकशी समितीला 15 दिवस उलटूनही विदर्भात फिरकली नाही. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काही ठिकाणी उमेदवारांनी अचानक माघार घेतली, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतफुटी झाली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रदेश काँग्रेसने 7 जुलै रोजी खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार भाई जगताप यांची चौकशी समिती स्थापन केली होती. मात्र, समिती स्थापन होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी या दोन्ही नेत्यांनी चौकशीसाठी विदर्भात अद्याप पाऊलही ठेवलेले नाही. त्यामुळे ही चौकशी समिती नेमकी कुठे दडून बसली आहे, असा थेट सवाल आता स्थानिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. भाई जगताप यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा पुरता खेळखंडोबा झाल्याचे चित्र होते. चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्याने भाजपचे अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले. भंडाऱ्यात माजी आमदार दिलीप बनसोड यांनी, तर यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने शिंदेसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवार हर्षवर्धन देशमुख ऐन निवडणुकीच्या काळात रुग्णालयात दाखल झाले, तर नागपुरात काँग्रेसला स्वपक्षीय हक्काची मतेही राखता आली नाहीत. पक्षातील वाढत्या तीव्र संतापानंतर प्रदेश काँग्रेसने चौकशी समिती जाहीर केली खरी, परंतु 15 दिवस उलटूनही ही समिती विदर्भातील चारही मतदारसंघांत जाऊन स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आलेली नाही. संबंधित नेते प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांना गांभीर्याने घेत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नेत्यांना वेळ नसेल, तर तातडीने समिती बदलून दुसऱ्या नेत्यांकडे चौकशीची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत विदर्भातील काही आक्रमक पदाधिकाऱ्यांनी थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठवली आहे. उमेदवारांची अनपेक्षित माघार, झालेली मतफुटी आणि जाहीर होऊनही चौकशी न करणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या मवाळ भूमिकेचा संपूर्ण गोषवारा या ई-मेलमध्ये देण्यात आला असून, केंद्रीय नेतृत्वाने यात तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Source link
विधान परिषद मतफुटी चौकशी कागदावरच:15 दिवस उलटूनही काँग्रेसची समिती विदर्भात फिरकली नाही