Headlines

वीजप्रश्नावरून उद्रेक, कामते शिंगवे ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण:स्वतंत्र गावठाण फिडर‎ आणि 4 नवीन‎डीपींसाठी रणकंद‎




तालुक्यातील कामते शिंगवे येथील प्रलंबित वीजप्रश्नांवर महावितरणकडून सतत होणाऱ्या टाळाटाळीला कंटाळून अखेर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. स्वतंत्र गावठाण फिडर, नवीन रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी (२३ जुलै) सरपंच गौतम कराळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाथर्डी तहसीलसमोर उपोषण सुरू केले. आंदोलकांनी महावितरण प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध करत तहसील परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. यापूर्वी प्रशासनाला लेखी निवेदने देऊनही महावितरणने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळेच हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळे गावातील वीजपुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. ‘आरडीएसएस’ योजनेंतर्गत मंजूर झालेली कामे कंत्राटदाराने अर्धवट ठेवली आहेत. या विलंबासाठी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कडक कारवाई झालीच पाहिजे, असे कामते शिंगवेच्या सरपंच गौतम कराळे यांनी सांगितले. स्वतंत्र गावठाण फिडर तातडीने मंजूर करून काम युद्धपातळीवर सुरू करावे. कामते शिंगवे गावठाण, लालनगर, संभाजी कराळे वस्ती आणि शरद कराळे वस्ती येथे नवीन डीटीसी (ट्रान्सफॉर्मर) उभारावेत, ३० अश्वशक्तीचा जाचक नियम रद्द करून २४ तास सिंगल फेज आणि शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीज द्यावी, आरडीएसएस योजनेतील दिरंगाईबद्दल कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. या उपोषणात बाळासाहेब कराळे, सुनील कराळे, माणिक कराळे, सुनील मिरपगार, अर्जुन कराळे, बापू कराळे, वसंत मिरपगार, राजेंद्र भोसले, अर्जुन दारकुंडे, भाऊसाहेब डोळस, राजाराम कराळे, रवींद्र कराळे, संकेत कराळे, पार्थ कराळे, कानिफ पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *